वय वाढतं तसं शरीरही हळूहळू बदलायला लागतं. केस पांढरे होतात, त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात, आणि सर्वात महत्वाचं आपल्या हालचाली मंदावतात. विशेषतः स्नायूंमध्ये जाणवणारी कमजोरी ही एक अशी गोष्ट आहे, जी सहजपणे लक्षातही येत नाही आणि हळूहळू आपल्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करू लागते. पण ही एक अपरिहार्य गोष्ट आहे असं समजून शांत बसण्याची गरज नाही. कारण योग्य काळजी घेतली, तर म्हातारपणातही तुम्ही तंदुरुस्त राहू शकता.

आपल्या शरीराचा सुमारे 60 टक्के भाग स्नायूंनी बनलेला असतो. चालणे, बसणे, उठणे, वजन उचलणे हे सगळं याच स्नायूंच्या जोरावर होतं. पण वयाच्या सुमारे 35 व्या वर्षानंतर ही ताकद कमी व्हायला लागते. सुरुवातीला फारसा फरक जाणवत नाही, पण जसजशी वर्षं पुढे सरकतात, तसतसे साधं खुर्चीतून उठणंसुद्धा जड वाटू लागतं. काही वेळ खुर्चीवर बसून राहिलं, की पाठ आणि कंबर कुरकुर करू लागते.
व्यायाम
यामुळेच फक्त चालणं पुरेसं नाही. हो, चालणं उपयोगी आहे, पण त्यासोबतच अशा काही गोष्टी कराव्या लागतात ज्या स्नायूंना आव्हान देतात आणि त्यांना पुन्हा ताकदवान बनवतात. यात वजन उचलण्याचे व्यायाम, डंबेल्स, स्क्वॅट्स, प्लँक्स, पुशअप्स अशा साध्या पण प्रभावी गोष्टींचा समावेश आहे. सुरुवात जरी थोड्या प्रमाणात केली, तरी हळूहळू शरीरात ताकद येऊ लागते. आठवड्यातून 4-5 दिवस असे व्यायाम करणं ही एक सवय बनवायला हवी.
आहार
व्यायामाशिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहार. स्नायूंना जेवढा व्यायाम आवश्यक आहे, तेवढाच योग्य पोषणही. आहारात प्रथिनांचा भर असावा. अंडी, दूध, डाळी, चीज, चिकन हे रोजच्या जेवणात असावं. त्यासोबतच कॅल्शियमसाठी हिरव्या भाज्या, दही, आणि व्हिटॅमिन-डीसाठी रोजचा थोडा वेळ सूर्यप्रकाशात घालवणंही महत्त्वाचं. बी-12 आणि इतर जीवनसत्त्वांसाठी बिया, फळं आणि तृणधान्यांचा समावेश करावा.
स्नायू कमकुवत होत आहेत का हे ओळखणंही तितकंच आवश्यक आहे. जर तुम्ही जमिनीवर बसल्यावर कोणत्याही आधाराशिवाय सहज उभे राहू शकता, तर तुमची स्थिती बरी आहे. पण जर हात-पायांमध्ये वारंवार थकवा, वेदना, किंवा पकड कमजोर वाटत असेल, तर ही नजरेआड करू नये अशी इशारे आहेत.