कोणत्याही कुटुंबाचं स्वप्न असतं आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होणं आणि निवृत्तीनंतरची काळजीमुक्त जीवनशैली. जर हे स्वप्न तुमचंही असेल, तर एक सरकारी योजना तुमचं भविष्य उज्ज्वल करू शकते. विशेष म्हणजे, ही योजना तुम्ही तुमच्या पत्नीच्या मदतीने वापरल्यास केवळ सुरक्षित परतावा नाही, तर 20 वर्षांत करोडपती होण्याचीही शक्यता असते. इतकंच नाही तर, दरमहा तब्बल 61,000 रुपयांची पेन्शन मिळवणंही शक्य आहे.

PPF स्कीम
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF ही सरकारमान्य दीर्घकालीन बचत योजना आहे. या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणुकीवर मिळणारं 7.1% हमी व्याज, तेही दरवर्षी चक्रवाढ पद्धतीनं दिलं जातं.
PPF मध्ये गुंतवणूक करायची असल्यास कोणतीही व्यक्ती बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये स्वतःचं खाते उघडू शकते. यामध्ये संयुक्त खाते परवानगीचं नसल्यामुळे पती-पत्नीने स्वतंत्र खाते उघडणं आवश्यक असतं. प्रत्येक व्यक्ती दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतो. ही गुंतवणूक पूर्णपणे जोखीममुक्त असून, त्यावर मिळणारे व्याज आणि मूळ रक्कम दोन्ही करमुक्त आहेत.
आता कल्पना करा, तुम्ही आणि तुमच्या पत्नीने दरमहा फक्त 12,500 रुपये PPF मध्ये गुंतवले, म्हणजे वर्षाला 1.5 लाख रुपये. हेच जर तुम्ही सलग 20 वर्षं केलं, तर तुमचं आणि तुमच्या पत्नीचं PPF खाते प्रत्येकी सुमारे 66.58 लाख रुपयांपर्यंत वाढेल. दोघांचं मिळून एकत्र उत्पन्न होईल तब्बल 1.33 कोटी रुपये. या रकमेवर तुम्हाला दरमहा अंदाजे 61,000 रुपये व्याज म्हणून मिळू शकते, म्हणजेच निवृत्तीनंतरची नियमित आणि स्थिर पेन्शनसारखी सुविधा.
15+5+5 सूत्र
ही योजना सामान्य उत्पन्न असणाऱ्या दाम्पत्यासाठी खूप उपयोगी आहे. त्यातही जर तुम्ही योजना 15 वर्षांनंतर वाढवून पुढील 5 वर्षे गुंतवणूक सुरू ठेवली, तर तुमचं उत्पन्न अधिक वाढेल. PPF मध्ये हे “15+5+5” सूत्र वापरल्यास, तुम्ही एक मोठा निधी सहज उभारू शकता.
या योजनेंतर्गत खातं सुरू ठेवण्यासाठी वेळेवर मुदतवाढीचा फॉर्म भरणं आवश्यक असतं. जर तुम्ही फॉर्म वेळेत भरला नाही, तर पुढील गुंतवणूक करता येणार नाही. त्यामुळे या प्रक्रियेबाबत थोडं जागरूक राहणं फायदेशीर ठरतं.