हिंदू धर्म म्हटलं की आपल्या मनात सात्विकतेचं एक पवित्र चित्र उभं राहतं. फुलं, फळं, दूध, तुप, साखर आणि गोड प्रसाद. पण भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात काही परंपरा इतक्या अनोख्या आहेत की त्या ऐकून क्षणभर आपण गोंधळून जाऊ शकतो. खरं सांगायचं झालं तर, काही मंदिरांमध्ये देवतेला अर्पण म्हणून मांस, मासे आणि अगदी मद्यसुद्धा दिलं जातं. आणि तेच नंतर प्रसाद म्हणून वाटलं जातं. ही परंपरा फक्त केवळ श्रद्धेची नाही, तर त्या त्या देवतेच्या रूपाशी, स्थानिक संस्कृतीशी आणि हजारो वर्षांच्या लोकपरंपरेशी जोडलेली आहे.

कामाख्या देवीचं मंदिर
उदाहरण द्यायचं झालं, तर पूर्व भारतातील आसाममध्ये वसलेलं कामाख्या देवीचं मंदिर हे अशा रीतिरिवाजांचं अत्यंत जिवंत रूप आहे. तंत्र साधनेचा गड मानलं जाणारं हे शक्तीपीठ, देवी सतीच्या योनीच्या स्थानावर वसलेलं असल्याचं मानलं जातं. इथे मासे आणि मांस देवीला अर्पण केलं जातं. आश्चर्य वाटेल पण हे भक्तांसाठी प्रसाद म्हणूनही दिलं जातं, आणि त्यामागे कुठलीही अपवित्र भावना नाही, हे शुद्ध भक्तीचं प्रतीक मानलं जातं.
कालीघाट मंदिर
या प्रकारचीच दुसरी गूढ परंपरा कोलकात्यातील कालीघाट मंदिरात पाहायला मिळते. हे मंदिर काली देवीचं आहे आणि इथे हजारो वर्षांपासून बकऱ्यांचा बळी दिला जातो. ही परंपरा फार प्राचीन आहे. त्यानंतर हे मांस भक्तांमध्ये प्रसाद म्हणून वाटलं जातं. हे ऐकून अनेकजण गोंधळतात, पण बंगालमधील शक्ती साधनेत याचं वेगळंच महत्त्व आहे.
मुनियांदी स्वामी मंदिर
दक्षिणेकडे जाऊन बघितल्यास मदुराईजवळचं मुनियांदी स्वामी मंदिर तामिळ संस्कृतीतील एक खास दर्शन घडवतं. भगवान मुनियांदी हे भोलेनाथाचं एक स्थानिक रूप मानलं जातं आणि इथे प्रसाद म्हणून चिकन व मटण बिर्याणी अर्पण केली जाते.
काल भैरव मंदिर
मध्य भारतातील उज्जैन शहरात वसलेलं काल भैरव मंदिर हेही या परंपरेचा एक वेगळा पैलू उघड करतं. इथे काल भैरवाला प्रसाद म्हणून मद्य अर्पण केलं जातं. मंदिरात एक खास कुंड आहे जिथून पुजारी देवतेला मद्य अर्पण करतात आणि अनेकदा ते मद्य कपातून अदृश्य होतं, असं भक्तांचं म्हणणं आहे. ही घटना अनेकांना चकित करते, पण श्रद्धेच्या नजरेतून बघितल्यास ती एक अलौकिक अनुभूती ठरते.