भारताचं संरक्षण क्षेत्र हे गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड वेगाने विकसित होत आहे. एकेकाळी परकीय शस्त्रास्त्रांवर अवलंबून असणाऱ्या भारताने आता स्वदेशी तंत्रज्ञानाच्या बळावर अशी शस्त्रं निर्माण केली आहेत की जगातील बलाढ्य देशांनाही त्याचं कौतुक वाटतंय. नुकत्याच पार पडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताच्या हवाई ताकदीचं दर्शन घडलं. सुखोई आणि राफेल विमानांपासून ब्रह्मोस मिसाईलपर्यंत अनेक यंत्रणांची चर्चा झाली. पण या सर्वांच्या पलीकडे एक असेही स्वदेशी शस्त्र आहे ज्याचं नाव आज जगातल्या बलाढ्य राष्ट्रांमध्ये घेतलं जात आहे, ते म्हणजे डीआरडीओने बनवलेली अत्याधुनिक तोफ.

ATAGS तोफ
ही तोफ केवळ एक युद्धसामग्री नाही, तर भारताच्या सामरिक ताकदीचं जिवंत उदाहरण आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) ही तोफ पूर्णपणे देशातच विकसित केली आहे. तिचं नाव आहे ATAGS (Advanced Towed Artillery Gun System). विशेष म्हणजे, ही तोफ इतकी शक्तिशाली आहे की ती भारताच्या सीमांवर उभी राहून पाकिस्तानमधल्या लाहोरसारख्या शहरांवर अचूक आणि जोरदार मारा करू शकते. याचं महत्त्व इतकं आहे की ज्या बोफोर्स तोफेने कारगिलमध्ये भारताला विजय मिळवून दिला, त्याहीपेक्षा ही तोफ अनेक पटींनी प्रभावी ठरली आहे.
ATAGS ही एक 155 मिमी/52 कॅलिबरची तोफ आहे. तिची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती लांब पल्ल्याचा अचूक मारा करू शकते. या तोफेची ‘शूट अँड स्कूट’ प्रणाली म्हणजे हल्ला केल्यानंतर लगेच जागा बदलण्याची क्षमता, जी युद्धाच्या रणांगणात शत्रूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. ही प्रणाली केवळ भारतातच नव्हे तर जगातसुद्धा खूप कमी देशांकडे आहे.
कदाचित अनेकांच्या मनात विचार येईल की अमेरिका, चीन यांच्याकडेही अशा ताकदीच्या तोफा असतील, पण वस्तुस्थिती वेगळी आहे. डीआरडीओने बनवलेली ही तोफ केवळ भारताचीच नाही, तर संपूर्ण जगातली एकमेव अशी तोफ आहे जी एवढ्या लांब अंतरावरून अचूक आणि सशक्त मारा करू शकते. यामुळेच ही तोफ केवळ शस्त्र नसून भारताच्या सामरिक आत्मनिर्भरतेचं प्रतिक ठरत आहे.
80 किमी अंतरावर अचूक मारा
सध्या ही तोफ राजस्थानच्या वाळवंटात आणि सियाचिनच्या बर्फाळ भागात दोन्ही ठिकाणी सहजतेने काम करू शकते. यापुढे डीआरडीओ तिची प्राणघातक क्षमता 50 किमीवरून 80 किमीपर्यंत वाढवण्याच्या तयारीत आहे. यामुळे भारताची युद्धताकद केवळ शेजारी देशांपुरती मर्यादित राहणार नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याचा प्रभाव अधिक ठळकपणे जाणवेल. चीन आणि अमेरिकेसारख्या महासत्तांनीही अद्याप अशी शस्त्रसज्जता विकसित केलेली नाही, हे भारतासाठी अभिमानास्पद आहे.