पावसाळ्यात घरात झुरळं दिसली की प्रचंड संताप येतो. केवळ ती घाण वाटतात असं नाही, तर त्यांच्या उपस्थितीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषतः स्वयंपाकघर आणि बाथरूममध्ये झुरळांचा वावर अधिक असतो. घर स्वच्छ असतानाही झुरळं कशी येतात हे कळत नाही आणि ती घरातून बाहेर काढणं एक मोठं आव्हान वाटतं. या लेखात आपण काही सोप्पे घरगुती उपाय पाहणार आहेत, जे वापरून तुम्ही या छोट्या पण त्रासदायक पाहुण्यांना घराबाहेरचा रस्ता दाखवू शकता.

साखर आणि बेकिंग सोडा
झुरळं घरात सतत दिसत असतील, तर साखर आणि बेकिंग सोडाचा वापर करा. दोन्ही गोष्टी समप्रमाणात मिसळा आणि झुरळं जिथे जास्त येतात, त्या कोपऱ्यांत शिंपडा. साखर झुरळांना आकर्षित करते आणि बेकिंग सोडा त्यांच्या शरीरात जाऊन त्यांच्या आत गॅस तयार करतो. यामुळे ती मरण पावतात. हा उपाय नियमित केल्यास लवकरच तुम्हाला फरक जाणवेल.
बोरिक अॅसिड
झुरळं नष्ट करण्यासाठी बोरिक अॅसिडदेखील प्रभावी मानलं जातं. थोडं पीठ घ्या, त्यात बोरिक अॅसिड मिसळा आणि त्याचे छोटे गोळे तयार करून झुरळं दिसणाऱ्या जागी ठेवा. ही पद्धत जरा वेळ घेणारी असली, तरी ती परिणामकारक आहे. मात्र, हे मिश्रण लहान मुलं किंवा पाळीव प्राणी ज्या ठिकाणी पोहोचू शकतात, तिथे ठेवू नका.
तमालपत्र
झुरळांना तीव्र वास सहन होत नाही, आणि तमालपत्राचा सुगंध झुरळांना दूर ठेवतो. तमालपत्रं बारीक करून झुरळं जिथे येतात तिथे ठेवा. काही दिवसांत त्या भागात झुरळांची संख्या कमी झाल्याचं तुम्हाला जाणवेल. तमालपत्र स्वस्त आणि सहज उपलब्ध असल्यामुळे याचा वापर करणं अधिक सोयीचं आहे.
स्वच्छतेची काळजी
झुरळं जिथे असतात, त्या ठिकाणी काही ना काही घाण साचलेली असते. म्हणूनच स्वयंपाकघर आणि बाथरूमची नियमित सफाई करणं अत्यावश्यक आहे. अन्नपदार्थ झाकून ठेवा, सिंक कोरडी ठेवा, भांडी रात्री धुऊन घ्या आणि कचऱ्याचे डबे नेहमी झाकून ठेवा. झुरळं लपण्यासारख्या भेगांमध्ये ती अंडी घालतात, त्यामुळे अशा भेगाही वेळेवर भरून टाका.
पावसाळ्यात किंवा बाथरूमजवळच्या भिंती ओलसर असतात, आणि तिथे झुरळं सहज वाढतात. अशा ठिकाणी वॉटरप्रूफिंग पेंट किंवा सीलंट वापरल्यास ओलसरपणा कमी होतो आणि झुरळांना वाट सापडत नाही. विशेषतः बाहेरच्या भिंतींना याचा जास्त फायदा होतो.