बँक FD की पोस्ट ऑफिस TD? कुठे गुंतवणूक केल्यास मिळेल जास्त नफा? फरक समजून घ्या!

Published on -

घर चालवताना दर महिन्याला येणाऱ्या खर्चाचा विचार करताच, आपल्याला बचतीचं महत्त्व अधोरेखित होतं. पण केवळ बचत करून चालत नाही, ती रक्कम योग्य ठिकाणी गुंतवणं हेच भविष्य सुरक्षित करतं. मग प्रश्न उभा राहतो बँकेतील फिक्स्ड डिपॉझिट (FD) चांगलं की पोस्ट ऑफिसमधील टाईम डिपॉझिट (TD)? कोणत्या पर्यायातून अधिक परतावा मिळतो? याचं उत्तर तुमच्या गरजांवर, कालावधीवर आणि जोखीम स्वीकारण्याच्या तयारीवर अवलंबून आहे.

आजच्या घडीला बहुतांश लोक एफडी म्हणजे फक्त बँकेचीच योजना, असा समज करून घेतात. पण पोस्ट ऑफिसही टाईम डिपॉझिटसारख्या योजनांद्वारे चांगला परतावा देते. उदाहरण द्यायचं झालं, तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सध्या 1 वर्षाच्या एफडीवर सुमारे 6.8% व्याज देते, तर पोस्ट ऑफिस 1 वर्षाच्या TD वर 6.9% व्याज देतं. एक टक्का फरक जरी छोटा वाटला, तरी लाखो रुपयांच्या गुंतवणुकीवर तो महत्त्वाचा ठरतो.

व्याजदरमधील फरक

जर तुमचा गुंतवणुकीचा कालावधी 5 वर्षांचा असेल, तर पोस्ट ऑफिसचा हात वरचढ ठरतो. SBI 5 वर्षांच्या एफडीवर 6.5% व्याज देतो, तर पोस्ट ऑफिस 7.5% व्याज देतो. म्हणजेच, जिथे जोखीम कमी आणि परतावा जास्त, तिथे पोस्ट ऑफिस अधिक आकर्षक वाटतं. याशिवाय, या दोन्ही योजना आयकराच्या कलम 80C अंतर्गत करसवलतीसाठी पात्र आहेत. म्हणजे तुमचं उत्पन्नही वाढतं आणि करही वाचतो.

मासिक उत्पन्न

तुम्हाला नियमित उत्पन्नाची गरज असेल, तर पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना (MIS) एक उत्तम पर्याय आहे. केवळ 1,000 रुपयांपासून सुरुवात करता येते, आणि या योजनेवर सध्या 7.4% व्याज मिळतं. या योजनेत एकल खात्याकरिता 9 लाख आणि संयुक्त खात्याकरिता 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. काही बँका देखील मासिक उत्पन्न देणाऱ्या योजना देतात, पण व्याजदर आणि स्थैर्याच्या बाबतीत पोस्ट ऑफिसचा पर्याय अधिक फायदेशीर ठरतो.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) या गुंतवणुकीसाठी दोघेही बँक आणि पोस्ट ऑफिस चांगले पर्याय आहेत. येथे वार्षिक 7.1% चक्रवाढ व्याज मिळतं आणि संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री असते. यामध्ये किमान 500 रुपयांपासून सुरुवात करता येते आणि वर्षाला 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करून कर सवलत मिळवता येते.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, बँक आणि पोस्ट ऑफिस यामधील निवड केवळ व्याजदरावरच नाही, तर सुविधा, स्थैर्य, गुंतवणुकीचा उद्देश आणि कालावधी या घटकांवरही अवलंबून असते. पोस्ट ऑफिस योजना ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागांत विशेषतः लोकप्रिय आहेत कारण त्या सोप्या, पारदर्शक आणि सरकारच्या थेट नियंत्रणाखाली असतात.

कोणती निवडाल?

एकंदरीत सांगायचं तर, लहान गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिस योजना जिथे स्थिरता आणि थोडं जास्त व्याज हवंय, तिथे उपयुक्त ठरतात. तर, ज्यांना बँकिंगशी संबंधित अधिक डिजिटल सुविधा हव्या आहेत, त्यांच्यासाठी बँक FD हा पर्याय आहे. पण परतावा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहता, पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट आणि मासिक उत्पन्न योजना सध्या अधिक आकर्षक वाटतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!