बदलेल्या जीवनशैलीमुळे आजकाल आजारांचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे अनेक जण व्यायाम, योगा याकडे वळत आहेत. योगा हा तर भारताने जगाला दिलेली देणगी आहे. योगाचे अनेक प्रकार आहेत. त्यातला एक खास प्रकार म्हणजे ‘कपालभाती प्राणायाम’. कुठलाही मोठा खर्च न करता, औषधांपासून दूर राहून आणि फारशी जागाही न घेता, हा एक असा सराव आहे जो शरीर आणि मन दोघांनाही ताजेतवाने करतो. तुम्ही जर तुमच्या दैनंदिन आयुष्यात कधी ना कधी थोडं वजन कमी करावं, प्रतिकारशक्ती वाढवावी, पचन चांगलं करावं असं म्हणत असाल, तर कपालभाती हा तुमच्यासाठी योग्य मार्ग आहे.

कपालभातीचे फायदे
आपण रोज धावतो, धकाधकीच्या जीवनात गुंततो. त्यात शरीराची शुद्धता, आतूनच झाली पाहिजे असं वाटतं का? तेव्हा कपालभाती तुमच्यासाठी एक वरदान ठरू शकतो. हा प्राणायाम असा आहे की तो श्वासाच्या माध्यमातून शरीरात साचलेली घाण आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकतो. ‘कपाळ’ म्हणजे कपाळ आणि ‘भाती’ म्हणजे झोत. ज्यावेळी आपण जोरात श्वास सोडतो, तेव्हा एक झोत कपाळापर्यंत पोहचतो आणि मन आणि शरीर दोन्ही झटक्यात जागृत होतात.
याचा सर्वांत पहिला परिणाम दिसतो आपल्या पोटावर. अनेकांना गॅस, बद्धकोष्ठता किंवा आम्लपित्त या त्रासांनी ग्रासलेलं असतं. पण जेव्हा पोटाच्या स्नायूंना सतत सक्रिय केलं जातं, तेव्हा आतड्यांमधील रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि पचनक्रिया सुधारते. हळूहळू अपचन, पोटफुगी यांसारखे त्रास कमी होतात आणि अंग हलकं वाटायला लागतं.
केवळ शरीरच नव्हे, तर मेंदूलाही याचा फायदा होतो. फुफ्फुसांत भरभरून हवा घेतली जाते, जोरात बाहेर टाकली जाते, तेव्हा मेंदूपर्यंत भरपूर ऑक्सिजन पोहोचतो. यामुळे लक्ष केंद्रीत राहायला मदत होते, स्मरणशक्ती सुधारते आणि सतत असलेली अस्वस्थता, चिंता यामध्ये बराच फरक पडतो. अनेक जण सांगतात की, केवळ काही आठवड्यांतच मन अधिक शांत आणि स्थिर झाल्याची अनुभूती त्यांना आली.
पोटावर साचलेली चरबी आणि वजन वाढ ही आजच्या जीवनशैलीची सामान्य समस्या आहे. कपालभातीसारख्या प्राणायामामुळे चयापचय प्रक्रियेला गती मिळते, आणि त्या सोबतच कॅलोरीजही जळतात. या प्रकारचा सराव केल्याने पोटाभोवती साचलेली चरबी हळूहळू कमी होऊ लागते , तेही कोणतीही जिम किंवा डाएटशिवाय.
श्वास घेण्याच्या अडचणी, सायनस किंवा दम्याचा त्रास असलेल्यांसाठी कपालभाती विशेष फायदेशीर आहे. कारण तो फुफ्फुसांची क्षमता वाढवतो आणि श्वसनमार्ग अधिक स्वच्छ ठेवतो. यामुळे हवेचा प्रवाह अधिक मोकळा आणि सुलभ होतो.
या सर्व फायद्यांमध्ये एक महत्त्वाचा फायदा म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं. शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर टाकले गेले की रक्ताभिसरण अधिक प्रभावी होतं आणि आपलं शरीर रोगांशी लढायला सज्ज होतं. बदलत्या हवामानात किंवा व्हायरल इन्फेक्शनच्या काळातही अशा प्रकारची अंतर्गत ताकद खूप उपयोगी पडते.
कसा करावा हा योग प्रकार?
हे सर्व ऐकल्यावर तुमच्याही मनात येत असेल कसे करावे हे? फार काही विशेष नाही. एका शांत जागेवर, जमिनीवर मांडी घालून बसा. पाठीचा कणा ताठ ठेवा, डोळे बंद करा. नाकाने हळुवार श्वास आत घ्या आणि मग झटक्याने सोडा. प्रत्येक वेळेस श्वास सोडताना पोट आत खेचायचं आहे. हे करता करता तुमचं संपूर्ण लक्ष फक्त श्वासावर केंद्रित करा. सुरुवात 2 ते 3 मिनिटांनी करा आणि हळूहळू 10 ते 15 मिनिटांपर्यंत वाढवा. रिकाम्या पोटी सकाळी हा सराव केल्यास अधिक फायदा होतो.
मात्र, काही विशेष स्थितीत जसं की गर्भावस्था, हृदयरोग, हर्निया किंवा स्लिप डिस्क असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.