प्रत्येक संस्कृती मृत्यूच्या संकल्पनेला वेगळ्या दृष्टीकोनातून पाहते. जिथे जगात बहुतांश ठिकाणी मृत्यू म्हणजे दुःख, अश्रू आणि शोकदायक शांतता असते, तिथे आफ्रिकेतील घाना नावाचा देश याच मृत्यूला एक साजरा करण्यासारखा क्षण मानतो. घानामध्ये अंत्यसंस्कार म्हणजे एका नव्या प्रवासाचा उत्सव, जिथे कुटुंब आणि नातेवाईक एकत्र येतात आणि मृत व्यक्तीच्या आयुष्याचा जल्लोष करतात.

घाना देश
या संस्कृतीत, जेव्हा कोणी मरण पावतो, तेव्हा घरातील वातावरण शोकमग्न न होता उलट आनंददायी असतं. कुटुंबीय मृत व्यक्तीसाठी एक मोठी पार्टी आयोजित करतात, ज्यामध्ये लाखो रुपयांचा खर्च होतो. या पार्टीमध्ये नाच, गाणी, खाणं आणि गर्दी असते अगदी लग्नासारखी. इतकंच नाही, तर लोक त्या दिवशी काळे आणि लाल रंगाचे खास कपडे परिधान करतात. लाल रंग ऊर्जा आणि जीवनाचं प्रतीक मानला जातो, तर काळा शोकाचं. दोघांचं एकत्रित अस्तित्व म्हणजेच जीवन आणि मृत्यू यामधील संतुलन.
मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांकडून विशेष सन्मानाच्या पद्धतीतही वैशिष्ट्य आहे. ते मृत व्यक्तीच्या छायाचित्रांसह छापलेले खास कपडे घालतात. यासोबतच, शवपेट्याही अगदी अनोख्या प्रकारे तयार केल्या जातात. मच्छीमार असेल तर मास्याच्या आकारातील शवपेटी, शिक्षक असेल तर पुस्तकाच्या आकारातील म्हणजे मृत व्यक्तीच्या जीवनशैलीशी संबंधित असलेली प्रत्येक गोष्ट शेवटपर्यंत सन्मानित केली जाते.
घानातील परंपरा आणि विश्वास
घानामधील लोकांचा असा विश्वास आहे की मृत्यू हे केवळ एका प्रवासाचे शेवट नसून दुसऱ्या प्रवासाची सुरुवात आहे. त्यामुळे, मृत व्यक्तीला अश्रूंनी नव्हे, तर हसत, नाचत आणि साजरा करत निरोप देणं हेच योग्य आहे, असा त्यांचा दृष्टिकोन आहे.
जरी जगभरातून या परंपरेवर टीका केली गेली, तरी घानाच्या लोकांनी आपल्या हजारो वर्षांच्या सांस्कृतिक वारशाशी घट्ट नातं जपले आहे. त्यांच्या मते, ही परंपरा केवळ मृत व्यक्तीचा सन्मान करत नाही, तर जिवंत व्यक्तींनाही जीवनाकडे एक नवा दृष्टिकोन देण्याचं काम करते. दुःखातही सौंदर्य शोधण्याची शिकवण देते.