कझाकस्तानमधील एक निर्णय सध्या संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरत आहे, तो म्हणजे महिलांना सार्वजनिक ठिकाणी हिजाब आणि बुरखा घालण्यावर घातलेली बंदी. हा निर्णय फक्त कायदेशीर नव्हे, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टिकोनातूनही मोठा वळण घेणारा मानला जात आहे. विशेष म्हणजे, ही बंदी एखाद्या युरोपियन देशात नाही, तर एका मुस्लिम बहुल देशात लागू करण्यात आली आहे.
कझाकस्तान
कझाकस्तान हे मध्य आशियातील एक स्वतंत्र आणि ऐतिहासिकदृष्ट्या मुस्लिम संस्कृतीशी निगडित राष्ट्र आहे. इथे सुमारे 70 टक्के जनता मुस्लिम आहे. हे लोक आपल्या पारंपरिक जीवनशैलीशी आणि धार्मिक संकेतांशी प्रामाणिक राहतात. मात्र या पार्श्वभूमीवर, चेहरा पूर्णपणे झाकणाऱ्या कपड्यांवर बंदी घालणं हा एक धक्कादायक निर्णय ठरला आहे. इतकंच नव्हे, तर तो त्यांच्या धार्मिक ओळखीवरच प्रश्नचिन्ह उभं करतोय, असं अनेक स्थानिक नागरिकांचं मत आहे.
या निर्णयामागे कझाकस्तान सरकारचं म्हणणं आहे की, त्यांना देशात सामाजिक एकता, सुरक्षा आणि धर्मनिरपेक्षता टिकवायची आहे. राष्ट्राध्यक्ष कासिम-जोमार्ट तोकायेव यांनी सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकणं हे अनेक वेळा गैरसमज आणि सुरक्षा धोके निर्माण करतं. त्यामुळे हा कायदा लागू करण्यात आला आहे.
कझाकस्तानमधील इतर समुदाय
कझाकस्तानमध्ये इस्लामव्यतिरिक्त इतरही धर्म आहेत. इथल्या सुमारे 25 टक्के लोकसंख्या ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांची आहे. उर्वरित 4 टक्के लोक बौद्ध, ज्यू, हिंदू, बहाई यांसारख्या विविध धर्मांचे आहेत. देशात 1 ते 2 टक्के लोक नास्तिक आहेत.
महत्त्वाचं म्हणजे, कझाकस्तान हा असा निर्णय घेणारा पहिला मुस्लिम देश नाही. अल्जेरिया, ट्युनिशिया, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, आणि तुर्कमेनिस्तान यासारख्या देशांनीही वेगवेगळ्या काळात हिजाब वा बुरखा यांच्यावर अंशतः वा पूर्णतः बंदी घातली आहे. केवळ मुस्लिम देशच नव्हे, तर फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, ऑस्ट्रिया यांसारख्या युरोपीय देशांमध्येही अशाच प्रकारचे कायदे करण्यात आले आहेत, तेही सार्वजनिक सुरक्षा वा धर्मनिरपेक्षतेच्या कारणास्तव.