डोकेदुखी म्हणजे फक्त वेदना नाही, तर ती आपल्या रोजच्या आयुष्यावर परिणाम करणारी तीव्र समस्या असते. विशेषतः मायग्रेन ही डोकेदुखीची एक अशी स्थिती आहे जी केवळ त्रासदायक नाही, तर शरीर आणि मन दोन्ही थकवून टाकते. या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. सोशल मीडियावर सध्या असा दावा केला जात आहे की कोल्ड्रिंक्स पिण्यामुळे मायग्रेनपासून तात्पुरता का होईना, पण आराम मिळू शकतो. पण यामागे खरोखर काही तथ्य आहे का? चला जाणून घेऊया.

आजच्या धावपळीच्या जीवनात मायग्रेन ही एक सामान्य समस्या झाली आहे. सतत स्क्रीनसमोर राहणे, झोपेच्या वेळेत बदल, अनियमित आहार, ताण-तणाव या साऱ्यांमुळे मायग्रेनची तीव्रता वाढते. डोळ्यांवर ताण, उजेड किंवा आवाजाची संवेदनशीलता, उलट्या होणे अशा लक्षणांसह येणाऱ्या या आजारात काही वेळा कोणताही उपाय उपयोगी पडत नाही.
कोल्ड्रिंक्स आणि मायग्रेन
इंग्लंडमधील जनरल प्रॅक्टिशनर आणि मायग्रेन ट्रस्टचे सदस्य डॉ. के. केनिस यांच्या मते, कोल्ड्रिंक्समध्ये असलेले कॅफिन हे काही रुग्णांमध्ये डोकेदुखी कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. कॅफिन मज्जासंस्थेवर परिणाम करत असल्यामुळे वेदना कमी करण्याची क्षमता त्यामध्ये असते. त्यामुळे काही प्रिस्क्रिप्शन पेनकिलर्समध्येही कॅफिनचा समावेश असतो.
डॉ. केनिस हे देखील सांगतात की कॅफिनचा परिणाम प्रत्येक रुग्णावर वेगवेगळा होतो. काही लोकांना कोल्ड्रिंक्समुळे आराम मिळतो, पण काहींसाठी ते उलट अधिक डोकेदुखीचे कारण ठरते. विशेषतः जे नियमितपणे जास्त कॅफिन घेतात, त्यांना अचानक त्याचे प्रमाण बदलल्याने ‘कॅफिन विड्रॉल’ होऊ शकतो आणि यामुळेच डोकेदुखी वाढू शकते.
सोशल मीडिया वरील दावे
सध्या सोशल मीडियावर अनेकांनी कोल्ड्रिंक्समुळे आपल्याला आराम मिळाल्याचे सांगितले आहे, पण हे वैयक्तिक अनुभव आहेत. सर्वसाधारणपणे, कोणतीही आरोग्यविषयक सवय डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अंगीकारणे धोकादायक ठरू शकते.
म्हणजेच, कोल्ड्रिंक्समुळे काही लोकांना मायग्रेनपासून तात्पुरता आराम मिळू शकतो, पण सगळ्यांसाठी हा उपाय योग्य नाही. तुम्हाला मायग्रेनचा वारंवार त्रास होत असेल, तर स्वतः उपचार करण्याऐवजी न्युरोलॉजिस्टचा सल्ला घेणे केव्हाही योग्य ठरेल.