तुम्हीही दररोज RO पाणी पिताय?, मग ही बातमी वाचाच; आरोग्याबाबत WHO ने दिला अत्यंत गंभीर इशारा!

Published on -

आपण स्वच्छ आणि सुरक्षित पाणी प्यावे, हे आपल्यासाठी जसे गरजेचे आहे, तसेच त्यातून मिळणाऱ्या पोषक तत्त्वांबद्दल जागरूक असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक घरांमध्ये आजकाल आरओ म्हणजेच रिव्हर्स ऑस्मोसिस पद्धतीने स्वच्छ केलेले पाणी नियमित पिण्यात येते. परंतु तुम्हाला माहित आहे का, की रोजचे आरओ पाणी प्यायल्यामुळे शरीराला काही महत्त्वाची खनिजे मिळेनाशी होतात? आणि यामुळे दीर्घकाळात आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो?

आरओ तंत्रज्ञान हे पाणी अत्यंत बारकाईने फिल्टर करते. यात एक सूक्ष्म पडदा असतो, जो बॅक्टेरिया, विषाणू, जड धातू अशा अनेक घातक घटकांना बाहेर टाकतो. पण याच प्रक्रियेमुळे कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखी शरीरासाठी आवश्यक खनिजेही 92 ते 99 टक्क्यांपर्यंत काढून टाकली जातात. परिणामी, पाण्याची टीडीएस पातळी 50 मिलिग्रॅम प्रति लिटरच्या खाली जाते, जी आरोग्यदृष्ट्या फारच कमी मानली जाते.

आरओ पाणी घातक की चांगले?

आरओ पाणी अनेक प्रकारच्या धोकादायक घटकांपासून संरक्षण करतं, हे खरे आहे. यातून पाण्याचा दुर्गंध, गाळ, रंग, धातू आणि इतर अशुद्धी काढून टाकली जाते. त्यामुळे ते कॉलरा, अतिसार, टायफॉइडसारख्या पाणीजन्य आजारांपासून सुरक्षित असते. पण हीच पद्धत, जेव्हा शरीरातील मूलभूत खनिजांचा अभाव निर्माण करते, तेव्हा समस्या सुरू होतात.

शास्त्रज्ञांच्या मते, नियमितपणे अशा पाण्याचा वापर केल्याने शरीरात कॅल्शियम, मॅग्नेशियम कमी होऊ लागतात. ही दोन्ही खनिजे हाडांच्या मजबुतीसाठी, हृदयाच्या कार्यासाठी आणि स्नायूंना योग्य पोषण मिळवण्यासाठी अत्यावश्यक असतात. लहान मुलांमध्ये हाडं लवकर मोडण्याचा धोका वाढतो. गर्भवती महिलांमध्ये अकाली प्रसूतीचा धोका अधिक होतो. वृद्धांमध्येही हाडांच्या कमकुवतपणामुळे अशक्तपणा वाढू शकतो.

आरोग्यावर होणारे परिणाम

आरओ पाणी अत्यंत कमी टीडीएसचे असल्यामुळे हृदयावरही त्याचा परिणाम दिसून येतो. संशोधनातून समोर आले आहे की, मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात आणि रक्तदाबही वाढू शकतो. हे सगळं पाहता, अशा पाण्याचा सातत्याने वापर केल्यास हृदयरोगाचा धोका नाकारता येत नाही.

असेही आढळून आले आहे की आरओ पाण्याचा पीएच 6.0 ते 6.5 दरम्यान असतो, जो थोडासा आम्लीय असतो. त्यामुळे काही लोकांना अ‍ॅसिडिटी किंवा अ‍ॅसिड रिफ्लक्ससारख्या पचनाशी संबंधित समस्या जाणवू शकतात. दीर्घकाळ अशा पाण्याचा वापर केल्याने पाचनसंस्था बिघडण्याची शक्यता असते.

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

जागतिक आरोग्य संघटनेने 2019 मध्ये एक महत्त्वाचा इशारा दिला होता की, अत्यल्प खनिज असलेले पाणी नियमित पिणे आरोग्यासाठी योग्य नाही. पिण्याच्या पाण्यात किमान 100 मिलिग्रॅम/लिटर टीडीएस असावा, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आरओ पाण्याचा वापर करताना योग्य सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.

पोषण तज्ञ सुद्धा या गोष्टीवर भर देतात की, अन्नातून जरी खनिज मिळत असले तरी पाण्यातून मिळणाऱ्या खनिजांचं योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. लहान मुलं, वृद्ध, गर्भवती महिला यांच्यासाठी तर ही बाब अधिक चिंतेची ठरते.

म्हणूनच, जर तुम्ही दररोज आरओ पाणी पित असाल तर तुमच्या आहारात भरपूर फळं, भाज्या आणि खनिजांनी समृद्ध अन्न घेणं आवश्यक आहे. शिवाय, आरओ सिस्टममध्ये ‘मिनरल रिमिनेरलायझेशन’ फिल्टर बसवण्याचा विचार करावा. ज्यामुळे काढून टाकलेली खनिजं परत पाण्यात मिसळली जातात आणि आरोग्यासाठी उपयुक्त पाणी मिळतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!