भारत देशात श्रद्धा ही केवळ एक भावना नाही, ती एक जीवंत संस्कृती आहे. जी हजारो वर्षांपासून प्रत्येक पिढीतून पुढे चालत आली आहे. इथं अनेकजण स्वतःवर कमी खर्च करून देवावर अधिक खर्च करतात, आणि तेही अगदी आनंदाने. इथल्या लोकांना असं वाटतं देवाला दिलेला प्रत्येक रूपया अनेक पटीने परत मिळतो. अशा या आस्थेच्या देशात एक मंदिर आहे, जे केवळ श्रद्धेचं केंद्र नसून धनसंपत्तीचंही अफाट भांडार आहे. हे मंदिर म्हणजे केरळमधील सुप्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिर, जे आज भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून ओळखलं जातं.

पद्मनाभस्वामी मंदिर
तिरुअनंतपुरम शहरात वसलेलं हे मंदिर केवळ सौंदर्य आणि शांतीसाठी प्रसिद्ध नाही, तर त्याच्या भव्य संपत्तीमुळेही जगाचं लक्ष वेधून घेतं. एका वर्षात या मंदिराला मिळणाऱ्या देणग्यांची रक्कम जवळपास 500 कोटी रुपये असते. पण या आकड्यानेच थांबू नका. या मंदिराची एकूण अंदाजित संपत्ती 12,000 कोटी रुपये इतकी असल्याचं सांगितलं जातं. ही संपत्ती केवळ रोख स्वरूपात नसून, सोनं, हिरे, चांदी आणि शतकोटींच्या मूळ्याच्या रत्नांच्या स्वरूपात तिथं गोळा झाली आहे.
हे मंदिर भगवान विष्णूच्या ‘पद्मनाभ’ या रूपाची पूजा करतं. या मंदिरात भगवान विष्णू अतीविशाल रूपात आहेत. ते त्यांच्या ‘अनंत’ नागावर शयनस्थ आहेत. त्यामुळेच या शहराला ‘तिरुअनंतपुरम’ म्हणजे ‘अनंताचा नगर’ असं नाव पडलं.
पद्मनाभस्वामी मंदिरावर आजही त्रावणकोर राजघराण्याचं संरक्षकत्व आहे. या घराण्याने सदैव भगवान विष्णूला आपले प्रमुख आराध्य मानले आणि त्यांच्या सेवेसाठी आपली संपत्ती खुली ठेवली. त्यांच्या या समर्पणाचा परिणाम म्हणजे, मंदिराचा प्रत्येक कोपरा सुवर्णाच्या तेजाने झळकतो.
मंदिराच्या तिजोरीतील खजाना
मंदिराच्या संपत्तीबाबत सर्वात मोठा खुलासा झाला तो तेव्हा, जेव्हा मंदिराच्या 7 पैकी 6 तिजोऱ्या उघडण्यात आल्या. या तिजोऱ्यांमध्ये जे काही सापडलं, ते ऐकूनही अनेकांच्या श्वासात श्वास राहिला नाही. सोन्याचे लाखो नाणे, किलोच्या किलो सोनं-चांदी, हिऱ्यांनी जडवलेले मुकुट, रत्नजडीत मूर्ती एकूणच या सगळ्याची अंदाजित किंमत 20 अब्ज डॉलर्स इतकी असल्याचं सांगितलं जातं. पण अजूनही सातवी तिजोरी उघडलेली नाही, आणि तिच्याबाबत अनेक आख्यायिका, दंतकथा, आणि धार्मिक श्रद्धा आजही सांगितल्या जातात.
या मंदिराच्या गर्भगृहाखाली असलेल्या गुप्त जागांमध्ये अनेक धक्कादायक सत्यं दडलेली आहेत. इतिहास आणि पुराणकथांनी भरलेल्या या जागेत असंही सांगितलं जातं की, हजारो वर्षांपूर्वी विविध राजघराण्यांनी युद्धात मिळालेली संपत्ती भगवान पद्मनाभाच्या चरणी अर्पण केली होती. त्यामुळे या मंदिरात असलेली संपत्ती ही केवळ पैशाचं मूल्य न घेता, एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा मानली जाते.