सौदी अरेबियात जर तुम्ही प्रवास करण्याचा किंवा तिथे वास्तव्यास जाण्याचा विचार करत असाल, तर या बातमीकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. या देशात 2025 च्या पहिल्या सहामाहीत मृत्युदंडाच्या शिक्षेची संख्या इतकी वाढली आहे की जगभरात त्याची तीव्र चर्चा आणि चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः, सौदी अरेबियातील काही कठोर कायदे आणि त्यांच्या अंमलबजावणीची पद्धत इतकी गंभीर आहे की, चुकूनसुद्धा काही गोष्टी केल्या तर त्याचा शेवट फाशीच्या शिक्षेने होऊ शकतो.
ड्रग्ज गुन्ह्यासाठी थेट मृत्युदंड

यासंबंधी नुकताच एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे, ज्यामध्ये सौदीतील न्यायप्रक्रियेतील गंभीर त्रुटी आणि मृत्युदंडाची भयावह वाढ उघड झाली आहे. या अहवालानुसार, 2024 मध्ये एकूण 345 लोकांना फाशी देण्यात आली, जे गेल्या 30 वर्षांतील सर्वाधिक आकडे आहेत. विशेष बाब म्हणजे ही संख्या केवळ हिंसक गुन्ह्यांमुळे नाही, तर बहुतांश अहिंसक ड्रग्ज प्रकरणांमध्ये सुनावण्यात आली आहे.
2025 मध्ये हा आकडा आणखी भीषण रूप धारण करू शकतो. या वर्षाच्या केवळ पहिल्या सहामाहीतच 180 जणांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यातले जवळपास दोन तृतीयांश आरोपी ड्रग्ज संबंधित प्रकरणांमध्ये दोषी ठरले होते, आणि त्यापैकीही बहुसंख्य परदेशी नागरिक होते. जानेवारी ते एप्रिलदरम्यान 88 फाश्या झाल्या असून, त्यापैकी 52 ड्रग्जसाठी होत्या. यातून हे स्पष्ट होते की, सौदीतील कायदा अत्यंत कठोर आहे आणि त्या नियमांची अंमलबजावणीदेखील तडजोडशून्य आहे.
या शिक्षांचा एक मोठा चिंतेचा मुद्दा म्हणजे न्यायप्रक्रियेमधील पारदर्शकतेचा अभाव. अॅम्नेस्टीच्या मते, अनेक आरोपींना जबरदस्तीने कबुलीजबाब देण्यात आले, त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ झाला आणि त्यांना कायदेशीर सल्लाही दिला गेला नाही. यामुळे त्यांच्या खटल्यांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. अॅम्नेस्टीच्या क्रिस्टीन बेकरले यांनी म्हटले आहे की सौदीतील कायदेशीर व्यवस्था आता आंतरराष्ट्रीय मानवाधिकार नियमांच्या सीमारेषा पार करत आहे.
आंतरराष्ट्रीय संस्था देखील हादरल्या
या पार्श्वभूमीवर, ह्यूमन राइट्स वॉच, रिप्रीव्ह आणि अॅम्नेस्टीसारख्या संघटना सौदी सरकारवर दबाव टाकत आहेत की, ड्रग्जसंबंधी गुन्ह्यांमध्ये मृत्युदंड थांबवावा आणि दोषींना योग्य न्यायप्रक्रियेचा अधिकार मिळावा. परंतु, आतापर्यंत या मागण्यांकडे सौदीकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.
सौदी अरेबिया सध्या आर्थिक सुधारणांवर आणि ‘व्हिजन 2030’ सारख्या योजनांवर भर देत असला, तरी अशा शिक्षांच्या प्रमाणामुळे त्याची आंतरराष्ट्रीय प्रतिमा आणि मानवी हक्कांबाबतची जागतिक विश्वासार्हता डागाळली जात आहे.
या पार्श्वभूमीवर, सौदी अरेबियात काम करण्यासाठी किंवा प्रवास करण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तींनी अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. तिथले कायदे, विशेषतः ड्रग्ज आणि सार्वजनिक आचरणाबाबतचे नियम, खूप कठोर आहेत आणि त्यांची अंमलबजावणी कोणतीही माफकता न ठेवता केली जाते. तुमचं एक छोटंसं पाऊल आयुष्यभराची शिक्षा ठरू शकते.