सकाळी उठल्यावर ‘ही’ 5 लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका, असू शकतो पोटाचा कर्करोग!

Published on -

सकाळची वेळ ही आपल्या शरीराच्या आरोग्याचा एक आरसा असते. आपण झोपेतून जागे झाल्यावर शरीर जे संकेत देते, त्यावरून आपल्या आरोग्याची पातळी समजते. पण अनेकदा काही लक्षणे इतकी सामान्य वाटतात की आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पोटदुखी, गॅस, मळमळ यासारख्या त्रासांना आपण थोडंसं अन्न बदलून किंवा घरगुती उपायांनी थोपवून धरतो. मात्र हीच लक्षणं काही वेळेस एका गंभीर आजाराची सुरूवात ठरू शकतात आणि त्यातला एक म्हणजे पोटाचा कर्करोग.

पोटाच्या कर्करोगाची लक्षणे

कर्करोग म्हटलं की आपल्या मनात लगेचच धसका भरतो. पण पोटाचा कर्करोग हा असाच एक धोका आहे जो अनेकदा लवकर लक्षातच येत नाही. कारण त्याची सुरुवात अगदीच सामान्य लक्षणांनी होते, जसं की सतत पोट फुगणं, गॅसचा त्रास, खाल्ल्यानंतर जडपणा किंवा सकाळी उठल्यावर छातीत जळजळ. हे ऐकायला सहज वाटणारे त्रास, पण जेव्हा दीर्घकाळ टिकतात, तेव्हा ते मोठा इशारा ठरू शकतात.

पोटात होणारी सततची वेदना किंवा सूज, जी काही वेळा औषधांनी कमी होत नाही, ती तुम्ही हलकं घेऊ नका. यासोबत जर भूक कमी वाटणं, लवकर पोट भरल्यासारखं वाटणं आणि वजन झपाट्याने घटत असेल, तर ही स्थिती निश्चितच चिंतेची आहे. पोटाचा कर्करोग आतून वाढत राहतो आणि जेव्हा तो बाहेरून लक्षात येतो, तेव्हा बराच वेळ निघून गेलेला असतो.

सकाळी उठल्यावर मळमळ होणं किंवा सतत उलट्या होणं हे पण दुर्लक्ष करण्यासारखं नाही. विशेषतः जर उलटी गडद तपकिरी रंगाची असेल किंवा त्यात रक्त दिसत असेल, तर त्वरित वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे. तसेच मलमूत्राच्या सवयींमध्ये बदल दिसल्यास म्हणजेच सारखा अतिसार, खूप दिवसांनी मल होणं, मलात रक्त किंवा काळा रंग दिसणं हेही गंभीर लक्षणं ठरू शकतात.

काल काळजी घ्याल?

या सगळ्याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी असा त्रास होतोच तेव्हा तो कर्करोग असतो. पण जर ही लक्षणं दोन आठवड्यांहून अधिक काळ सतत जाणवत असतील, आणि त्यावर कोणताही घरगुती उपाय किंवा औषध काम करत नसेल, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे.

आपल्या जीवनशैलीतले छोटे बदलही यावर मोठा प्रभाव टाकू शकतात. सकस आणि ताजं अन्न खाणं, तणाव कमी करणं, दररोज थोडा वेळ चालणं किंवा योगासारखा व्यायाम करणंहे सगळं पचनसंस्थेचं आरोग्य सुधारण्यास मदत करतं. मुख्य म्हणजे शरीर जेव्हा काही सांगतंय, तेव्हा त्याचं ऐकणं गरजेचं आहे.

पोटाचा कर्करोग हा लवकर ओळखला तर त्यावर उपचारही शक्य होतात. केमोथेरपी, रेडिएशन किंवा शस्त्रक्रियेच्या माध्यमातून त्यावर नियंत्रण मिळवता येतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!