आपल्या धावपळीच्या जीवनात ट्रेन चुकणे ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. अनेकदा आपण तिकीट काढतो आणि ट्रेन सुटते, आणि मग हताश होऊन ते तिकीट फेकून देतो. पण रेल्वेचं तिकीट ट्रेन चुकल्यावर निरुपयोगी ठरतं हे समजणं चुकीचं आहे. अनेकांना हे माहीतच नसतं की, ट्रेन चुकल्यानंतरही तुमचं तिकीट काही प्रमाणात उपयोगी ठरू शकतं, आणि हो, तुमचे पैसेही परत मिळू शकतात.

खरंतर, आजच्या घाईगडबडीत ट्रेन चुकणं ही फार सामान्य गोष्ट झाली आहे. पण तिकीट फाडून टाकण्याऐवजी जर आपण थोडा संयम ठेवून रेल्वेच्या नियमांची माहिती घेतली, तर काही गोष्टी आपल्या फायद्याच्या ठरू शकतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही जनरल तिकीट घेतलं असेल म्हणजे कुठल्याही विशिष्ट सीटचं आरक्षण नसेल आणि ट्रेन चुकली, तर त्या तिकिटावर तुम्ही नंतर दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता. कारण जनरल तिकीट म्हणजेच फक्त प्रवासाची परवानगी, नक्की जागेची नव्हे.
कन्फर्म कोचचं तिकीट असेल तर…
पण जर तुमचं तिकीट आरक्षित असेल म्हणजे कन्फर्म कोचचं तिकीट आणि ट्रेन चुकली, तर मात्र थोडीशी कसरत करावी लागते. अशा वेळी तुम्ही तसंच तिकीट घेऊन दुसऱ्या ट्रेनमध्ये चढू शकत नाही. पण जर परिस्थिती काहीशी गंभीर असेल, किंवा तुमच्याकडे योग्य कारण असेल, तर ट्रेनच्या टीटीईला ते सांगून तुम्ही मदत मागू शकता. काही वेळा, जर दुसऱ्या ट्रेनमध्ये जागा उपलब्ध असेल, तर टीटीई तुम्हाला त्या ट्रेनमध्ये बसवण्याची व्यवस्था करू शकतो. पण हे सगळं केवळ जागा उपलब्ध असेल आणि परिस्थिती समजून घेण्यासारखी असेल, तेव्हाच शक्य होतं.
रिफंड कसं मिळेल?
जर तुम्हाला तिकिटाचा परतावा हवा असेल, तर त्यासाठी रेल्वेने खास एक सोय उपलब्ध करून दिली आहे टीडीआर, म्हणजे ‘तिकीट ठेव पावती’. जर ट्रेन चुकल्यानंतर तुम्हाला प्रवासच करायचा नसेल, तर तुम्ही टीडीआर दाखल करून तुमचे काही पैसे परत मागू शकता. पण यामध्येही एक अट आहे. ट्रेन चुकल्यानंतर केवळ 1 तासाच्या आत टीडीआर भरायला हवा. उशीर झाला, की परतफेडीचा हक्क संपतो.
जर तुम्ही IRCTC अॅप किंवा वेबसाइटवरून तिकीट बुक केलं असेल, तर टीडीआर घरी बसून ऑनलाईन भरता येतो. पण स्टेशनवरून तिकीट घेतलं असल्यास, तिथे प्रत्यक्ष जाऊन TDR फॉर्म भरावा लागतो.