आपण सध्या ज्या प्रकारच्या हवामान बदलांच्या संकटाला सामोरे जात आहोत, त्याचं मूळ केवळ तापमानवाढीत नाही, तर त्यामागे अनेक अदृश्य आणि जटिल प्रक्रियांचा हात असतो. शास्त्रज्ञांनी आता एक नवीन आणि धक्कादायक इशारा दिला आहे, भविष्यात पृथ्वीला एकाच वेळी दोन टोकांचे नैसर्गिक आघात सहन करावे लागतील. एकीकडे हिमनद्या वेगाने वितळत जातील, तर दुसरीकडे ज्वालामुखींचे स्फोट अधिक तीव्र आणि वारंवार होतील. या प्रक्रियेचा परिणाम म्हणजे हवामान आणखी अस्थिर होईल आणि संपूर्ण मानवजातीला त्याचा गंभीर फटका बसू शकतो.

ज्वालामुखीचे संकट
हा अभ्यास दक्षिण चिलीतील सहा ज्वालामुखींच्या हालचालींवर आधारित आहे, आणि तो प्रागमध्ये नुकत्याच झालेल्या गोल्डश्मिट परिषदेत सादर करण्यात आला. अभ्यासाचे प्रमुख लेखक पाब्लो मोरेनो येगर यांच्या मते, हिमनद्या ज्वालामुखींना थांबवण्याचं काम करतात. त्या थरांखालचं दडपण ज्वालामुखीचा विस्फोट टाळतं. मात्र, जसजसे हे बर्फ वितळायला लागतील, तसतसे भूगर्भातील दडपण सुटू लागेल आणि त्यातून मॅग्मा आणि गॅसचा स्फोटक उद्रेक होऊ शकतो.
अंटार्क्टिका, न्यूझीलंड, रशिया आणि उत्तर अमेरिका यांसारख्या भागांमध्ये असंख्य हिमनद्यांच्या खाली झोपलेल्या ज्वालामुख्यांचा धोका अधिक गहिरा आहे. एका अहवालानुसार, अशा 245 पेक्षा अधिक सक्रिय किंवा संभाव्य ज्वालामुखी पृथ्वीवर आहेत, जे सध्या बर्फाखाली लपलेले आहेत. मात्र हवामान बदलामुळे बर्फाचे संरक्षण दूर होऊ लागल्याने ते उघडे पडत आहेत, आणि त्यामुळे अचानक उद्रेक होण्याची शक्यता वाढत आहे.
हिमनद्या वितळल्या तर…
या घटनेमागे विज्ञान अतिशय सरळ आहे, पण परिणाम प्रचंड आहेत. जेव्हा हिमनद्यांचे टनभर वजन पृथ्वीवरून कमी होतं, तेव्हा भूगर्भातील द्रव्यांना (मॅग्मा आणि वायूंना) अधिक मोकळं वाटतं. त्यामुळे ते वेगाने वर उसळतात आणि ज्वालामुखीच्या उद्रेकाला गती मिळते. हे परिवर्तन आधीच आइसलँडमध्ये स्पष्ट दिसून आलं आहे, जिथे 2002 च्या अभ्यासात ज्वालामुखी स्फोटांची वारंवारता 30 ते 50 पट वाढल्याचं नोंदवण्यात आलं होतं.
केवळ स्फोटांची भीतीच नाही, तर त्यांच्या परिणामांचा विचारही भयंकर आहे. अल्पकालीन स्फोटांमुळे वातावरणात सल्फेट एरोसोल पसरतात, जे सूर्यप्रकाश परावर्तित करून पृथ्वी थंड करतात. याचा परिणाम म्हणजे दुष्काळ, पावसात अनियमितता आणि शेतीवर तातडीचा परिणाम. तर दीर्घकालीन परिणाम म्हणून हे स्फोट हरितगृह वायूंचं प्रमाण वाढवतात, ज्यामुळे पृथ्वीचं तापमान आणखी वाढतं आणि हवामान बदल वेगाने घडू लागतो.