खरंतर वैद्यकीय क्षेत्राकडे पाहिलं की अनेकांच्या मनात पहिल्यांदा MBBS किंवा डॉक्टर होण्याचं स्वप्न डोकावून जातं. पण या वाटेवर येणारा NEET नावाचा अडथळा अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांपासून दूर ढकलतो. काहीजण यामुळे हार मानतात, तर काहीजण पर्याय शोधतात. आणि खरं सांगायचं झालं, तर अशा पर्यायांची आज काही कमतरता नाही. MBBS नसेल, तरीही वैद्यकीय क्षेत्रात प्रतिष्ठा, स्थैर्य आणि लाखोंची कमाई मिळवता येते. विशेष म्हणजे, हे सगळं दहावी नंतरही शक्य आहे.

दहावी नंतर NEET ची वाट न धरता, फार्मसी, लॅब टेक्नॉलॉजी, नर्सिंग किंवा रेडिओलॉजीसारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना एक उज्ज्वल भविष्य देऊ शकतात. D.Pharm हा त्यापैकी एक प्रमुख अभ्यासक्रम असून, यामध्ये औषधनिर्मितीपासून ते वितरणापर्यंतचे ज्ञान दिलं जातं. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा दोन वर्षांचा डिप्लोमा आहे आणि त्यातून तयार होणारे फार्मासिस्ट, हॉस्पिटल फार्मसीमध्ये किंवा मेडिकल स्टोअरमध्ये आपली ठसठशीत ओळख निर्माण करू शकतात. कमाईही काही कमी नाही, सुरुवातीला दरवर्षी 2 ते 5 लाख सहज मिळू शकतात.
लॅब टेक्निशियन
लॅब टेक्निशियन होणं हे सुद्धा एक जबाबदारीचं आणि गरजेचं काम आहे. DMLT अर्थात डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना निदान प्रक्रियेत निपुण बनवतो. रक्त, मूत्र, थुंकी यासारख्या नमुन्यांवर काम करणाऱ्या या तज्ञांची प्रत्येक हॉस्पिटलमध्ये गरज असते. जरी हा कोर्स 20,000 ते 1 लाख रुपयांत पूर्ण होतो, तरी नंतर वर्षाला 6 लाखांपर्यंतचा पगार मिळण्याची शक्यता असते.
नर्सिंग क्षेत्र
नर्सिंग क्षेत्रात तर महिलांसोबत आता अनेक पुरुषांचाही ओढा वाढला आहे. ANM आणि GNM हे दोन डिप्लोमा कोर्स या क्षेत्रात प्रवेश देतात. हे अभ्यासक्रम केवळ वैद्यकीय ज्ञान देत नाहीत, तर माणुसकीचं आणि काळजीचं खूप मोठं पाठ मिळवून देतात. आजच्या घडीला नर्सेसची मागणी देशभरातच नव्हे, तर परदेशातसुद्धा खूप आहे.
रेडिओलॉजी
तसंच रेडिओलॉजीसारखा एक तंत्रज्ञानावर आधारित कोर्ससुद्धा दहावी नंतर करता येतो. एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय यांसारख्या अत्याधुनिक तपासण्या शिकवणारा हा दोन वर्षांचा कोर्स सध्या प्रचंड मागणीला आहे. त्यातून तयार होणारे तंत्रज्ञ रुग्णालयातील अनिवार्य घटक बनले आहेत. त्यांची कमाई सुरूवातीलाच 3 ते 6 लाख दरवर्षीची असते, आणि अनुभव वाढताच ती 10 लाखांपर्यंत पोहोचते.
डेंटिस्ट
दंतस्वास्थ्य क्षेत्रातही एक वेगळी ओळख तयार करता येते. दहावी नंतर दोन वर्षांचा दंत स्वच्छता डिप्लोमा घेऊन तुम्ही दंत चिकित्सालयांमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावू शकता. डोळ्यांच्या तपासणीसाठी ऑप्थॅल्मिक टेक्नॉलॉजी हा कोर्स सुद्धा खूप नाव कमावतो आहे. हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीत डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे तज्ञ हे वैद्यकीय क्षेत्रात आवश्यक ठरले आहेत.
हे सगळे पॅरामेडिकल अभ्यासक्रम MBBS पेक्षा कमी खर्चात, कमी कालावधीत आणि कमी स्पर्धेने एका स्थिर, सुरक्षित आणि सन्माननीय करिअरकडे नेणारे मार्ग आहेत. विशेषतः जे विद्यार्थी NEET पास करण्याचा आत्मविश्वास बाळगत नाहीत, त्यांच्यासाठी हे कोर्स एक नवा प्रकाश देणारे आहेत.
आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या अभ्यासक्रमांमुळे केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही भरपूर संधी उपलब्ध आहेत. यूके, कॅनडा, मध्यपूर्व देशांमध्ये नर्सेस, फार्मासिस्ट आणि टेक्निशियन यांची मागणी सतत वाढते आहे. त्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये आणि सर्टिफिकेट्स मिळवल्यानंतर वर्षाला 10 ते 20 लाख कमावणे शक्य होते.