उत्तराखंड हे राज्य जे आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी, आध्यात्मिक केंद्रांसाठी आणि पर्यटनासाठी ओळखलं जातं, तिथेच आज विनाशाची छाया घोंगावत आहे. डोंगरांच्या कुशीत वसलेलं हे राज्य एका गंभीर आपत्तीच्या उंबरठ्यावर उभं आहे, आणि ही आपत्ती आभासिक नाही, तर शास्त्रज्ञांनी स्पष्टपणे दिलेला इशारा आहे.

उत्तराखंडमधील स्थिती
गेल्या काही दशकांपासून उत्तराखंडमध्ये अनेक वेळा भूकंपाचे सौम्य झटके जाणवले आहेत, परंतु हे केवळ मोठ्या संकटाची सूचक घंटा आहेत, असं वैज्ञानिक मानतात. वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजीसह इतर संशोधन संस्थांनी स्पष्ट केलं आहे की हिमालयाच्या आत खोलवर, पृथ्वीच्या गर्भात विनाशकारी ऊर्जा साठली आहे आणि ही ऊर्जा जर एकाच क्षणी मुक्त झाली, तर तिचा परिणाम केवळ उत्तराखंडपुरता मर्यादित न राहता संपूर्ण उत्तर भारतात महाविनाश घडवू शकतो.
भूकंपाच्या दृष्टीने उत्तराखंड झोन-4 आणि झोन-5 या अतिसंवेदनशील भागांमध्ये मोडतो. इथं दरवर्षी सुमारे 40 मिमीचा भूपृष्ठ बदल होतो, जो हिमालयाखाली असलेल्या टेक्टोनिक प्लेट्सच्या टक्करमुळे घडतो. आणि हे फक्त वैज्ञानिक परिकल्पना नाही; 1991 मध्ये उत्तरकाशी, 1999 मध्ये चमोली आणि 2015 मध्ये नेपाळमध्ये झालेल्या भूकंपांनी याचे भीषण परिणाम आपल्यासमोर मांडले आहेत. विशेषतः नेपाळमध्ये झालेल्या 7.8 तीव्रतेच्या भूकंपात सुमारे 9,000 लोकांचा मृत्यू झाला होता आणि उत्तराखंडही या संभाव्य यादीत सामील आहे.
आपत्ती व्यवस्थापन किती अलर्ट?
एक मोठा प्रश्न म्हणजे , जर आपत्ती इतकी स्पष्ट आहे, तर आपण त्यासाठी किती सज्ज आहोत? उत्तराखंडच्या ग्रामीण भागांत तर आपत्ती व्यवस्थापनाची अवस्था फारच कमकुवत आहे. 2023 मध्ये बद्रीनाथ आणि केदारनाथमध्ये आलेल्या पुरांमध्ये ही दुर्बलता स्पष्टपणे समोर आली होती. एवढंच नव्हे तर, सध्या केवळ दोन सक्रिय जीपीएस स्टेशन्स हिमालयात आहेत जे प्लेट्सच्या हालचालींवर लक्ष ठेवतात. वैज्ञानिकांनी स्पष्टपणे सुचवलं आहे की अधिक GPS मापन केंद्रं उभारणं अत्यंत गरजेचं आहे, कारण त्याद्वारे जमिनीखाली साठणाऱ्या ऊर्जेचा आणि प्लेट्सच्या हालचालींचा अधिक अचूक अंदाज घेता येईल.
हिमालयातील टनकपूरपासून डेहराडूनपर्यंतच्या भागात जमिनीचा दबाव वाढतो आहे. ही आकुंचन प्रक्रिया भूकंपाच्या दृष्टीने धोकादायक आहे. शिवाय, गढवाल आणि कुमाऊं या दोन भागांच्या भूगर्भीय रचनेत फरक असल्यामुळे दोन्ही ठिकाणी भूकंपांचा परिणामही वेगवेगळा असतो. त्यामुळे संभाव्य आपत्तीची व्याप्ती किती गंभीर असेल, हे निश्चित सांगणं कठीण आहे.