घरगुती अन्नही होऊ शकतं विषारी! पावसाळ्यात फ्रीजसबंधी FSSAI ने सांगितलेल्या टिप्स नक्की फॉलो करा

Published on -

पावसाळा म्हटलं की निसर्गाच्या विविध रूपांची उधळण, मात्र याच काळात आरोग्याच्या बाबतीतही काळजी घेणे आवश्यक असते. कारण, याच दिवसात साथीच्या आजारातही वाढ होते. सतत आर्द्रतेमुळे घराबाहेरच नव्हे, तर घरातल्या स्वयंपाकघरातसुद्धा धोक्याची घंटा वाजते. खासकरून फ्रिजमधली अन्नपदार्थं जी आपण सुरक्षित समजतो, तीही या मोसमात सहज बिघडू शकतात. याच पार्श्वभूमीवर FSSAI म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने एक महत्त्वाचा इशारा दिला आहे, जो प्रत्येक घरासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो.

दर १५ दिवसांनी फ्रिजची स्वच्छता

आपण दररोज स्वयंपाक करतो, अन्न साठवतो, थंड पदार्थ ठेवतो, पण फ्रिजची स्वच्छता मात्र अनेकदा दिवसेंदिवस लांबणीवर टाकतो. FSSAI चा स्पष्ट सल्ला आहे. पावसाळ्यात दर 15 दिवसांनी एकदा तरी फ्रिज नीट स्वच्छ करा. कारण हा हंगाम म्हणजे बॅक्टेरिया आणि बुरशीच्या वाढीसाठी उत्तम संधी. हवेतली आर्द्रता फ्रिजमध्येही शिरकाव करते आणि तिथून सुरुवात होते सूक्ष्म जंतूंच्या वाढीला. हीच बॅक्टेरिया-फंगस आपलं अन्न दूषित करतात, जे कधीकधी विषबाधेचे रूपही घेऊ शकते.

घरी बनवलेलं अन्नही जर योग्य तापमानात साठवले नसेल किंवा दूषित फ्रिजमध्ये ठेवले गेले असेल, तर ते शरीरासाठी विषासारखं ठरू शकतं. अशा अन्नामुळे उलटी, पोटदुखी, अतिसार यांसारख्या समस्यांचा धोका निर्माण होतो, विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आजारी लोकांसाठी.

बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वापर

फ्रिज नीट स्वच्छ केला, तर त्याचे फायदे केवळ आरोग्यापुरते मर्यादित राहत नाहीत. फ्रिजची कार्यक्षमताही वाढते. डीफ्रॉस्टिंगमुळे बर्फ साचत नाही, थंडावा योग्य प्रमाणात राहतो आणि वीजेचा वापर कमी होतो. म्हणजे एकीकडे आरोग्य सुरक्षित राहतं, तर दुसरीकडे वीजेची बचतही होते.

 

फ्रिज स्वच्छ करताना, तो बंद करून आतली सगळी सामग्री बाहेर काढा. नंतर एक ओलसर मऊ कपडा घेऊन सर्व आतील भाग, ट्रे, रबरच्या पट्ट्या आणि कोपरे पुसून घ्या. त्यानंतर कोरड्या कपड्याने सर्व काही नीट वाळवा. जर तुम्हाला आणखी चांगली स्वच्छता हवी असेल, तर बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा हलका द्रावण वापरू शकता. हे मिश्रण केवळ बॅक्टेरिया नष्ट करत नाही, तर वासही दूर ठेवतो.

डीफ्रॉस्ट फंक्शन तपासा

फ्रिजमधील डीफ्रॉस्ट फंक्शनसुद्धा वेळोवेळी वापरणं गरजेचं आहे. यातून साचलेला बर्फ वितळतो, थंड होण्याची प्रक्रिया सुरळीत राहते आणि फ्रिजचे आयुष्यमानही वाढते. स्वच्छतेच्या बाबतीत एक भाग आपण हमखास विसरतो. तो म्हणजे फ्रिजचं दार, त्याचा रबर पट्टा आणि खालच्या कडा. हे सगळे भाग म्हणजे बॅक्टेरियांच्या वसाहतीसाठी योग्य जागा. त्यामुळे हे सर्व नीट कोपरा-कोपरा करून पुसणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!