नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर अनेक जणांना कर भरावा लागतो. पण एक गोष्ट अजूनही बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही, ती म्हणजे जरी तुम्ही कोणत्याही कर स्लॅबमध्ये येत नसाल, म्हणजेच तुमचं उत्पन्न इतकं नसेल की त्यावर कर भरावा लागेल, तरीही ‘आयकर विवरणपत्र’ म्हणजेच ITR भरणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. अनेकांना वाटतं की, “आपण एवढं कमावत नाही, मग ITR कशाला भरायचं?” पण ही कल्पना चुकीची आहे. उलट, ITR हा तुमचं भविष्य आर्थिकदृष्ट्या अधिक सुरक्षित करणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरतो.

समजा एखाद्याचं उत्पन्न इतकं कमी आहे की त्याला कर भरण्याची गरज नाही, तरीही तो व्यक्ती म्युच्युअल फंड, शेअर बाजार, फिक्स्ड डिपॉझिट किंवा इतर योजनांमध्ये गुंतवणूक करतो. या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर जर काही टॅक्स वसूल झाला असेल, तर त्या व्यक्तीने ITR भरल्याशिवाय तो टॅक्स परत मिळवता येणार नाही.
ITR भरण्याचे फायदे
तुम्ही बँकेकडून कर्ज घ्यायचं ठरवलं तर तुमचे आर्थिक व्यवहार किती पारदर्शक आहे हे बघण्यासाठी बँका तुमच्याकडून गेल्या काही वर्षांच्या ITR पावत्या मागतात. नुसतं बँक स्टेटमेंट किंवा पगाराची स्लिप पुरेशी राहत नाही. आयटीआर दाखवणं म्हणजे तुमचं नियमित उत्पन्न, त्यावरचं नियंत्रण आणि आर्थिक शिस्त याचा पुरावा. मग तो गृहकर्ज असो, गाडीचं कर्ज, किंवा एखाद्या स्टार्टअपसाठी लागणारा बिझनेस लोन सगळ्याच बाबतीत ITR हे तुमचं ओळखीचं आणि विश्वासार्हतेचं शस्त्र ठरतं.
पुढे एक प्रसंग समोर येतो तो म्हणजे व्हिसासाठी अर्ज करण्याची वेळ. परदेशात जाण्याचं स्वप्न बघणाऱ्या अनेक तरुणांना हे लक्षात येतं की, व्हिसा अर्जामध्ये ITR हे आवश्यक कागदपत्र आहे. तुम्ही गेल्या तीन-पाच वर्षांत नियमितपणे ITR भरलेले असतील, तर व्हिसा अधिकाऱ्यांसमोर तुमची आर्थिक पार्श्वभूमी स्पष्ट आणि सकारात्मक दिसते.
आणि हो, जर तुम्ही मोठ्या विम्याचं संरक्षण घ्यायला गेलात समजा एक कोटी रुपयांचा टर्म प्लॅन तर विमा कंपनीही विचारते की, तुम्ही आर्थिकदृष्ट्या तो प्रीमियम भरू शकता की नाही. त्यासाठी ITR हाच आधार असतो.
केवळ हेच नव्हे, तर जेव्हा तुम्हाला तुमचं उत्पन्न सिद्ध करायचं असतं, तेव्हा ITR इतकं स्पष्ट आणि सरकारमान्य प्रमाणपत्र दुसरं काही नसतं. तुमचा फॉर्म 16, पगाराची माहिती आणि TDS याच्या मागेही ITR हे एकत्रित प्रतिबिंब असतं. तुम्ही कुठं काम करता, किती कमावता, किती गुंतवता सगळं काही यात स्पष्ट दिसतं. आणि हो, काही सरकारी प्रक्रिया किंवा नोंदणी करताना ITR ही पावती तुमच्या पत्त्याचाही विश्वासार्ह पुरावा बनते.