PF खात्यात कमी रक्कम असतानाही मिळेल लाखोंचा विमा! नव्या नियमांमुळे कर्मचाऱ्यांना दिलासा, जाणून घ्या क्लेम करण्याची संपूर्ण प्रक्रिया

Published on -

देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांच्या दर महिन्याच्या पगारातून थोडीफार रक्कम कापली जाते, भविष्य निर्वाह निधीसाठी. ही रक्कम कधीच फारशी महत्त्वाची वाटत नाही, पण आयुष्यात अनपेक्षित घडामोडी घडल्यावर, हाच निधी कुटुंबासाठी आधार बनतो. विशेषतः, जेव्हा कर्त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू होतो, तेव्हा हेच पैसे त्यांच्या पाठीमागे असलेल्या कुटुंबासाठी मोठा आधार ठरू शकतात.

ईपीएफओचे नवीन नियम

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ही योजना जरी फंड जमा करण्यासाठी असली, तरी तिच्यातून मिळणारे फायदे केवळ सेवानिवृत्तीनंतरच नाही, तर अपघाती किंवा अकस्मात मृत्यूनंतरही मिळतात. ईपीएफओने याच संदर्भात काही महत्त्वाचे आणि कुटुंबासाठी दिलासादायक निर्णय घेतले आहेत. पूर्वी, जर एखाद्या कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात किमान ₹50,000 शिल्लक असतील तरच त्यांच्या कुटुंबाला विम्याचा लाभ मिळायचा. पण आता ही अट हटवण्यात आली आहे. म्हणजेच खात्यातील शिल्लक कितीही असो, कुटुंबाला किमान ₹50,000 चा विमा मिळणार आहे.

ही रक्कम Employee Deposit Linked Insurance (EDLI) योजनेअंतर्गत दिली जाते. या योजनेमुळे, कामगाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला एकरकमी विमा मिळतो. विशेष म्हणजे या योजनेसाठी कामगाराकडून कोणतीही स्वतंत्र प्रीमियम भरावी लागत नाही. ही संपूर्ण सवलत सरकार आणि कंपनीच्या योगदानातून मिळते.

एक मोठा दिलासा म्हणजे, जर कर्मचाऱ्याचा मृत्यू शेवटचा पगार मिळाल्यापासून 6 महिन्यांच्या आत झाला, तरीही त्याच्या कुटुंबाला हा विमा मिळतो. शिवाय, कामगाराच्या नोकरीत 60 दिवसांचं अंतर असेल, तरीही त्याचा रोजगार सलग मानला जाईल. म्हणजेच, दोन नोकऱ्यांमधील लहानसा ब्रेक विम्याच्या हक्कावर परिणाम करत नाही.

क्लेम कसा कराल?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कायदेशीर वारसदाराने EPFO कडे क्लेम दाखल करावा लागतो. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजे मृत्युपत्र किंवा वारसाचे प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, नोकरी प्रमाणपत्र, आणि ओळखपत्राची झेरॉक्स. क्लेम प्रक्रियेसाठी आता EPFO द्वारे ऑनलाइन सुविधाही उपलब्ध आहे.

पीएफ खात्याशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे, कंपनीचा दरमहा 12% योगदान. यातील 3.67% रक्कम पीएफमध्ये तर 8.33% कर्मचारी पेन्शन योजनेत (EPS) जाते. ही पेन्शन रक्कम भविष्यातील सुरक्षिततेसाठी उपयोगी पडते. जर गरज भासली, तर घरखरेदी, शिक्षण, लग्न किंवा गंभीर आजार यासाठी अंशतः रक्कम काढता येते. निवृत्तीनंतर संपूर्ण रक्कमही मिळते.

 

सरकार आता अशा व्यवस्थेवर काम करत आहे जिच्याद्वारे तुम्ही निवृत्त होण्याआधीही, गरजेनुसार पीएफ मधील रक्कम सहजपणे काढू शकाल. एकंदरीत पाहता, भविष्य निर्वाह निधी ही फक्त एक बचत योजना नसून, आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आधार बनली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!