सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वजन वाढणे, शरीर स्थूल होणे आणि लठ्ठपणाशी संबंधित आजार बळावणे हे सामान्यच झालं आहे. अनेकदा याचे कारण थेट व्यायामाचा अभाव मानले जाते. पण ताज्या संशोधनानुसार, केवळ व्यायाम न करणे हे लठ्ठपणाचे प्रमुख कारण नाही, तर चुकीच्या खाण्याच्या सवयी त्यामागे आणखी मोठी भूमिका बजावत आहेत.

आजकाल लठ्ठपणा हा एक सार्वत्रिक प्रश्न झाला आहे. मुलं असो की प्रौढ, बहुतेक जण याच्या विळख्यात अडकलेले दिसतात. यासाठी लोक अनेकदा डायटिंग करतात, जिममध्ये वेळ घालवतात, पण तरीही वजन कमी होत नाही. यामागचं मूळ कारण काय असू शकतं, याचा शोध घेतला गेला आणि निष्कर्ष आश्चर्यकारक होता. शरीरातील ऊर्जा खर्च फारसा बदललेला नाही, पण अन्नपदार्थांमध्ये झालेला बदल जबाबदार ठरला.
संशोधनात काय आढळले?
ड्यूक विद्यापीठातील संशोधकांनी 34 देशांमधील सुमारे 4,200 लोकांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला. यात त्यांचा ऊर्जा खर्च, चरबीचं प्रमाण आणि बीएमआय (BMI) तपासण्यात आलं. विशेष बाब म्हणजे, श्रीमंत देशांतील लोक आधीइतक्याच किंवा कधी कधी त्याहून अधिक ऊर्जा वापरत होते. म्हणजेच, व्यायामात फारसा फरक पडलेला नव्हता. मग वजन कसं वाढतंय?
प्राध्यापक हरमन पोंट्झर सांगतात की, लठ्ठपणामागे आहारातील बदल हे मुख्य कारण आहे. आधुनिक, श्रीमंत जीवनशैलीमुळे खाण्याच्या सवयी बदलल्या आहेत. साखर, मैदा, प्रक्रिया केलेले पदार्थ, फास्ट फूड्स यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शरीरात चरबी साठते आणि वजन वाढते.
आहार आणि व्यायाम दोन्ही महत्वाचे
संशोधक अमांडा मॅकग्रोस्की यांच्या मते, जेव्हा देश आर्थिकदृष्ट्या प्रगती करतात, तेव्हा लोकांचा आहार अधिक कॅलोरीयुक्त होतो. हाच बदल लठ्ठपणासाठी जबाबदार ठरतो. त्यामुळे व्यायामाला महत्त्व देणं आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर अन्नावर नियंत्रण ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
अभ्यास सांगतो की, आरोग्य सांभाळायचं असेल तर आहार आणि व्यायाम दोघांनाही समान महत्त्व द्यायला हवं. एकमेकांची पूरक असलेली ही साधनं एकत्रित वापरली तरच वजनावर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल.