आपण अनेकदा अचानक मोठी रक्कम मिळाल्यावर विचारात पडतो, आता या पैशांचं नेमकं करायचं तरी काय? बचत खात्यात ठेवू, की थेट एफडी करावी? कारण एफडी म्हणजे सुरक्षितता आणि हमखास परतावा. पण खरं सांगायचं तर, आजच्या काळात एवढ्यावर समाधान मानणं म्हणजे आर्थिक संधी गमावणं होईल. कारण एफडीपेक्षा जास्त परतावा देणारे, आणि तुमच्या पैशाला खऱ्या अर्थाने वाढवणारे अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत. चला, अशाच 10 जबरदस्त गुंतवणूक पर्यायांबद्दल जाणून घेऊयात, जे केवळ तुमच्या पैशाचं संरक्षणच करत नाहीत, तर तुमचं स्वप्नांचं घर उभं करण्यासाठी भक्कम आर्थिक पाया देखील घालतात.
‘राष्ट्रीय पेन्शन योजना’

सर्वात आधी, जेव्हा निवृत्तीनंतरचा काळ डोळ्यासमोर ठेवून दीर्घकालीन नियोजन करायचं असतं, तेव्हा ‘राष्ट्रीय पेन्शन योजना’ ही उत्तम वाट ठरते. यात तुम्ही दरमहा थोडीशी रक्कम गुंतवता आणि वर्षानुवर्षं तुम्ही एक मोठा निधी साठवू शकता. आणि हो, यात करसवलतीचाही लाभ मिळतो.
‘सरकारी रोखे’
जर गुंतवणुकीसाठी तुम्हाला अगदी शंभर टक्के सुरक्षित पर्याय हवा असेल, तर ‘सरकारी रोखे’ हा पर्याय विचारात घ्या. बँकेच्या एफडीपेक्षा काहीसा अधिक परतावा मिळतो आणि सरकारी हमी असल्यामुळे मनातल्या शंका दूर होतात.
‘म्युच्युअल फंड’
पण सध्या सगळ्यात जास्त गाजत असलेला, आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेला पर्याय म्हणजे ‘म्युच्युअल फंड’. विशेषतः SIP मार्गे गुंतवणूक करणं हे तर आजच्या तरुणांचं आवडतं माध्यम बनलं आहे. नियमित थोडी रक्कम गुंतवून तुम्ही 12 ते 15% पर्यंत परतावा मिळवू शकता, पण यात काही प्रमाणात जोखीम देखील असते.
‘रिअल इस्टेट’
मालमत्तेत गुंतवणूक करायची असल्यास ‘रिअल इस्टेट’ एक उत्तम पर्याय ठरतो. पण यात गुंतवणुकीसाठी मोठी एकरकमी रक्कम लागते. एकदा पैसे गुंतवले की काही वर्षांतच त्याची किंमत 3 ते 5 पट वाढू शकते.
‘पीपीएफ’
‘पीपीएफ’ हा देखील एक सुरक्षित आणि करसवलतीसह येणारा पर्याय आहे. या योजनेत 15 वर्षांचा लॉक-इन कालावधी आहे, पण तुमचा पैसा सरकारच्या तिजोरीत सुरक्षित असतो आणि नियमित व्याज मिळतं.
‘गोल्ड ईटीएफ’
सोने, तेही ‘गोल्ड ईटीएफ’च्या स्वरूपात, ही देखील एक आधुनिक गुंतवणूक शैली आहे. यामध्ये प्रत्यक्ष सोनं खरेदी न करता, शेअर्सच्या स्वरूपात सोने विकत घेतलं जातं. त्याचा फायदा म्हणजे साठवणुकीची चिंता नाही, आणि बाजारभाव वाढला की परतावाही चांगला मिळतो.
‘बाँड आणि डिबेंचर’
‘बाँड आणि डिबेंचर’ देखील एफडीच्या तुलनेत अधिक परतावा देतात. काही कंपन्या 6 ते 14% व्याज दराने बाँड जारी करतात. हे परतावे निश्चित असतात, त्यामुळे नियमित उत्पन्नासाठी हे फायदेशीर ठरू शकतात.
‘इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम’
‘इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS)’ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना करबचतीसाठी हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. यात 1.5 लाखांपर्यंतची रक्कम करपात्र उत्पन्नातून वजा करता येते. आणि चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास परतावाही आकर्षक मिळतो.
जर तुम्ही थेट शेअर बाजार समजून घेतला असेल, तर ‘डायरेक्ट इक्विटी’ म्हणजेच स्टॉक्समध्ये थेट गुंतवणूक हा अधिक परतावा देणारा मार्ग ठरतो. मात्र, यात अनुभवी गुंतवणूकदारांसाठीच संधी आहे, कारण बाजाराच्या चढ-उतारांशी जुळवून घ्यावं लागतं.
‘किसान विकास पत्र’
शेवटचा, पण गावागावात सहज उपलब्ध असलेला आणि पूर्णपणे सुरक्षित पर्याय म्हणजे ‘किसान विकास पत्र’. सध्या यावर 7.5% व्याज मिळतं आणि 9 वर्षं 7 महिन्यांत तुमचे पैसे दुप्पट होतात. किमान 1,000 रुपयांपासून सुरू करता येतं आणि त्यावर कोणतीही कमाल मर्यादा नाही.