देवी दुर्गेची पूजा म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हे, तर एक आत्मिक अनुभव आहे. तिच्या चरणी भक्तीने नतमस्तक होणं म्हणजे आपल्या जीवनातील अडचणी, भीती आणि अशक्तपणावर विजय मिळवण्याचा एक पवित्र मार्ग आहे. दुर्गा म्हणजे शक्ती, धैर्य, आणि संरक्षण यांचं जिवंत रूप. तिची कृपा मिळवण्यासाठी कुठलेही मोठमोठे यज्ञ किंवा खर्चिक पूजा आवश्यक नाहीत, गरज आहे ती फक्त मन:पूर्वक श्रद्धेची.
तुपाचा दिवा

जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या जीवनात अडथळ्यांची साखळी सुरू आहे, मानसिक अस्थिरता किंवा भय तुमच्या मागे लागलं आहे, तर एकदा आई दुर्गेच्या चरणांमध्ये नतमस्तक व्हा. सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावून तिच्या नावाचा जप करा. घराच्या पूजास्थळी जर शांततेने, प्रेमाने एक तास तिच्यासाठी दिला, तर ती नक्की प्रसन्न होते. विशेषत: दिवा विझू न देणं, हा भक्तीचा एक अलिखित नियम मानला जातो. कारण दिवा म्हणजे तेज, आणि देवी म्हणजेच तेजस्विनी.
शुक्रवारी उपवास
जर तुम्ही तिचं विशेष लक्ष वेधून घ्यायचं ठरवलं असेल, तर शक्य असल्यास शुक्रवारी उपवास ठेवा. त्या दिवशी लाल आसनावर बसून पूजा करा. कारण लाल रंग हा आई दुर्गेच्या शक्तीचं प्रतीक आहे. तिच्यासाठी जास्वंदची लाल फुलं वाहा आणि मुलींना अन्नदान करा. हे आईला विशेष प्रिय आहे. 5 किंवा 7 मुलींना खाऊ घालणं हे एक प्रकारचं देवीचं प्रत्यक्ष पूजन मानलं जातं.
दुर्गेचा भोग
आई दुर्गेला भोग अर्पण करताना जर मध मिसळलेलं दूध दिलं, तर तिचा आशीर्वाद मिळण्याची शक्यता अधिक असते. भोगानंतर तिची आरती नक्की करा आणि आरतीसोबत घंटा वाजवून वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करा. ती केवळ पूजेसाठी नव्हे, तर तुमच्या मनासाठीही उपयुक्त ठरते.
मंत्र
शेवटी, आई दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी काही प्रभावी मंत्रांचाही उच्चार करा. यामध्ये एक मंत्र आहे:
“सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्तुते”
हा मंत्र तिच्या मंगलमय स्वरूपाला समर्पित आहे. तो म्हणताना प्रत्येक शब्दात श्रद्धा आणि निष्ठा असली पाहिजे. दुसरा एक शक्तिशाली मंत्र:
“ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते”
हा मंत्र आईच्या रौद्र आणि रक्षण करणाऱ्या रूपांना समर्पित आहे. दररोज हा जप केल्याने तुमच्या जीवनात एक नवीन उत्साह, आत्मविश्वास आणि शांती नक्की निर्माण होईल.