तिकीट बुकिंगपासून भाडेवाढीपर्यंत… IRCTC चे 7 नवे नियम लागू, जाणून घ्या तुमच्यावर काय परिणाम होईल?

Published on -

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक महत्त्वाचे नियम बदलले आहेत. हे सर्व नियम जुलै 2025 पासून लागू करण्यात आले असून, याचा थेट परिणाम सामान्य प्रवाशांवर होणार आहे. हे बदल केवळ तिकीट बुकिंगपुरते मर्यादित नसून, त्यामध्ये तात्काळ तिकिटांपासून ते तिकीट वेळ, एजंट बुकिंग मर्यादा, आणि भाडेवाढीपर्यंत अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत.

तात्काळ तिकीट

सर्वात पहिला नियम म्हणजे तात्काळ तिकिटांची प्रक्रिया. याआधी जशी सहजगत्या तात्काळ तिकिटं मिळत असत, तसं आता शक्य होणार नाही. आता जर कोणालाही तात्काळ तिकिट बुक करायचं असेल, तर आधी आपलं आधार कार्ड IRCTC च्या वेबसाइटवर पडताळलेलं असणं अनिवार्य आहे. ही अट 1 जुलैपासून लागू झाली असून, या धोरणामुळे फसवणुकीला आणि बनावट ओळखीने बुकिंग करणाऱ्यांना चाप बसवला जाणार आहे.

OTP द्वारे पडताळणी

 

आता तुम्ही काउंटरवरून किंवा एखाद्या एजंटमार्फत तिकीट बुक करत असाल, तर फक्त आधार पडताळणी पुरेशी राहणार नाही. 15 जुलैपासून, OTP द्वारे तिकीटाची अधिकृत पडताळणी करावी लागेल. म्हणजे प्रवास करणाराच व्यक्ती तिकिटाच्या प्रक्रियेत सहभागी आहे हे सुनिश्चित केलं जात आहे. यातून रेल्वे अधिक पारदर्शक आणि सुरक्षित प्रणालीकडे वाटचाल करत आहे.

तिकीट बुकिंग

प्रवाशांच्या हितासाठी आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे, एजंटद्वारे होणाऱ्या बुकिंगवर मर्यादा. याआधी सकाळीच बरेच एजंट तिकीटं पटकावून टाकायचे, त्यामुळे सामान्य प्रवाशांना वेळेत तिकीट मिळवणं कठीण व्हायचं. आता एसी तिकिटांसाठी सकाळी 10 ते 10:30 आणि नॉन-एसी साठी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत एजंटांना तिकीट बुक करता येणार नाही. त्यामुळे आता सामान्य माणसालाही आपल्या बुकिंगसाठी अधिक संधी मिळेल.

तिकीट भाडेवाढ

नव्या नियमांमध्ये सर्वात जास्त चर्चेचा मुद्दा म्हणजे तिकीट भाडेवाढ. ही भाडेवाढ सर्वसामान्य प्रवाशाच्या खिशाला बसणारी गोष्ट आहे, पण रेल्वेच्या दृष्टीने पाहता ती आवश्यक वाटते. वंदे भारत, राजधानी, शताब्दी, तेजस, दुरांतो, महामना यासारख्या प्रीमियम गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांना आता अधिक भाडं मोजावं लागेल. 500 किमीच्या प्रवासासाठी मात्र ही वाढ लागू नसेल, पण त्यापेक्षा लांब प्रवासासाठी दर टप्प्याटप्प्याने वाढवले गेले आहेत. उदाहरणार्थ, 501 ते 1,500 किमी प्रवासासाठी ₹5 अधिक, 1,501 ते 2,500 किमी साठी ₹10 आणि 2,501 ते 3,000 किमी साठी ₹15 अधिक मोजावे लागणार आहेत.

आरक्षण चार्ट

या सर्व बदलांमध्ये एक सकारात्मक गोष्ट म्हणजे आरक्षण चार्ट आता ट्रेन सुटण्याच्या 8 तास आधी तयार केला जाईल. याआधी फक्त 4 तास आधीच हा चार्ट तयार होत असे, त्यामुळे प्रवाशांना शेवटच्या क्षणीच सीट मिळते की नाही याची चिंता लागून राहायची. आता प्रवासाच्या आधीच सीट स्टेटस माहीत होईल, त्यामुळे प्रवासाचं नियोजन करणं अधिक सोपं होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!