भारताचा भूगोल नद्यांच्या प्राचीन आणि पवित्र प्रवाहांनी भरलेला आहे. या नद्या केवळ पाण्याचा स्रोत नाहीत, तर त्या आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि भावनांचा एक महत्त्वाचा भाग आहेत. गंगा, यमुना, नर्मदा अशा नद्यांबद्दल आपण अनेक कथा ऐकल्या आहेत, पण या प्रवाहांची लांबी किती आहे, आणि कोणती नदी सर्वात लांब आहे, हे फारच थोड्या लोकांना ठाऊक असतं. या लेखात आपण भारतातील सर्वात लांब नद्या आणि त्यांच्या महत्वाबद्दल जाणून घेणार आहोत.
गंगा नदी

सर्वात पहिलं नाव येतं गंगा नदी. उत्तराखंडच्या हिमालयात, गंगोत्री हिमनदीतून उगम पावणारी गंगा नदी तब्बल 2,525 किलोमीटरचा प्रवास करते. ती आपल्या पवित्रतेसाठी ओळखली जाते आणि हजारो वर्षांपासून ती भक्ती, जीवन आणि मोक्षाचं प्रतीक राहिली आहे. गंगेचा प्रवास केवळ भौगोलिक नव्हे, तर आध्यात्मिकही आहे.
गोदावरी नदी
दुसऱ्या क्रमांकावर गोदावरी नदी आहे. ती महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरपासून उगम पावते आणि सुमारे 1,465 किलोमीटरचा प्रवास करत आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर बंगालच्या उपसागरात विलीन होते. ‘दक्षिण गंगा’ म्हणून ओळखली जाणारी गोदावरी दख्खनच्या भूप्रदेशाला समृद्ध करते.
कृष्णा नदी
तिसऱ्या क्रमांकावर कृष्णा नदी आहे, जी महाराष्ट्रातील महाबळेश्वरजवळ उगम पावते. तिचा 1,400 किलोमीटरचा प्रवास कोकणातून आंध्र प्रदेशात जातो आणि अखेर तीही बंगालच्या उपसागरात मिळते. कृष्णा नदीच्या काठावर अनेक संस्कृती विकसित झाल्या आहेत.
यमुना नदी
चौथ्या स्थानावर आहे यमुना जिला गंगेची बहिण देखील म्हणतात. यमुनोत्री हिमनदीतून उगम पावणारी ही नदी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये गंगेशी एकरूप होते. 1,376 किलोमीटर लांबीची ही नदी केवळ पवित्रतेसाठी नव्हे, तर उत्तर भारताच्या सिंचन आणि जलप्रवाहासाठी महत्त्वाची मानली जाते.
नर्मदा नदी
पाचव्या क्रमांकावर आहे नर्मदा नदी. मध्य प्रदेशातील अमरकंटक टेकड्यांमध्ये उगम पावणारी ही 1,312 किलोमीटर लांब नदी, गुजरातमध्ये अरबी समुद्रात मिळते. नर्मदेच्या पात्रात असलेलं सौंदर्य आणि शांतता भाविकांना एक वेगळेच समाधान देते.
सिंधू नदी
सहाव्या क्रमांकावर सिंधू नदीचा उल्लेख करायला हवा. ती तिबेटमधील मानसरोवरजवळ उगम पावते आणि 3,180 किलोमीटरचा प्रवास करते, ज्यापैकी 1,114 किलोमीटर भारतात वाहते. सिंधूचं ऐतिहासिक महत्त्व खूप आहे, सिंधू संस्कृतीचे मूळ इथेच आहे.
ब्रह्मपुत्रा नदी
सातव्या स्थानावर आहे ब्रह्मपुत्रा, जी तिबेटमधील अंग्सी हिमनदीतून उगम पावते आणि 2,900 किलोमीटर वाहते, पण भारतात ती सुमारे 916 किलोमीटर अंतर पार करते. ब्रह्मपुत्रा नदी विशेषतः आसामसाठी जीवनरेषा मानली जाते.