गॅस, अपचन, रक्तदाब, हृदयरोग अन्…; ‘जल योग’ करण्याचे फायदे ऐकून थक्क व्हाल!

आधुनिक जगात, ताण, चिंता आणि रक्तदाबासारख्या समस्यांनी ग्रासलेल्या जीवनशैलीत योग म्हणजे एक आश्वासक मार्ग. पण जेव्हा योग जमिनीऐवजी पाण्यात केला जातो, तेव्हा तो फक्त शरीराची लवचिकता वाढवत नाही, तर मनालाही खोलवर शांततेचा अनुभव देतो. 2025 च्या योग दिनाच्या पार्श्वभूमीवर, ‘जल योग’ अर्थात वॉटर योगाविषयी पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. जल योग हा एक असा प्रकार आहे, जो शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्य सुधारण्यातही रामबाण उपाय मानला जातो.

जल योग

जल योग हा कोणताही नवखा प्रकार नाही, पण भारतात अजूनही अनेकांसाठी तो थोडा अपरिचित आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये मात्र या प्रकाराने अनेक लोकांचे आयुष्य बदलले आहे. पाण्याच्या गाभ्यात बसून, स्थिर शरीराने आणि श्वासावर नियंत्रण ठेवत केली जाणारी ही साधना मनात खोलवर उतरते. पाण्यात शरीराचे वजन कमी वाटते, त्यामुळे जास्त त्रास न होता शरीराला योग्य स्थितीत ठेवणे शक्य होते. त्यामुळे ज्यांना सांधेदुखी, वजन, किंवा व्यायाम करताना थकवा जाणवतो, त्यांच्यासाठी जल योग खूप उपयुक्त ठरतो.

जल योगचे फायदे

उच्च रक्तदाब, नैराश्य, अपचन, यकृताचे विकार किंवा मूत्रपिंडाचे त्रास अशा अनेक व्याधींवर जल योग अत्यंत प्रभावी उपाय ठरतो. पाण्याच्या संपर्कामुळे शरीर थंड राहतं, त्यामुळे हृदयाच्या कार्यावरही सकारात्मक परिणाम होतो. विशेष म्हणजे, जल योगामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. जल योग केल्यावर चेहऱ्यावर तेजही दिसून येतो, कारण शरीर पूर्णतः स्फूर्तिदायक अवस्थेत जातं.

जल योगात काही विशिष्ट आसने अधिक प्रभावी ठरतात. उदाहरणार्थ ताडासन, कोणासन, तिर्यक ताडासन आणि गरुडासन ही काही अशी आसने आहेत जी पाण्यात सहज करता येतात. शरीराला आधार मिळाल्यामुळे या आसनांत स्थैर्य येतं आणि त्यातून एकाग्रता अधिक सुलभपणे साधता येतो.

पाण्यात केल्या जाणाऱ्या प्राणायामाचा अनुभव तर अगदी वेगळाच असतो. शांत पाण्यात बसून, डोळे मिटून, फक्त श्वासांवर लक्ष केंद्रित केलं तर मनातील सारा कलह जणू निवळतो. ही अवस्था काही क्षण तरी आपण स्वतःशी जोडलेले असल्याचा अनुभव देते.