आपण आजवर सोनं, हिऱ्याला किंवा प्लॅटिनमला जगातली सर्वात मौल्यवान गोष्ट समजत होतो. पण खरं सांगायचं तर, हे सगळं या एका अद्भुत घटकासमोर फिकं आहे. ही गोष्ट इतकी महागडी आणि दुर्लभ आहे की तिच्याबद्दल अर्ध्या जगाला अजून माहितीही नाही. विज्ञानाच्या अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये निर्माण होणाऱ्या या पदार्थाचं नाव आहे, एंटीमेटर. आणि त्याची किंमत इतकी प्रचंड आहे की, ती ऐकून कोणीही थक्क होईल.

एंटीमेटर म्हणजे नुसताच एखादा वैज्ञानिक शोध नाही, तर तो एक प्रकारचं चमत्कार आहे. त्याची किंमत प्रति ग्रॅम तब्बल $62.5 ट्रिलियन डॉलर्स आहे. म्हणजे भारतीय रुपयांमध्ये जवळपास 5,000 लाख कोटी रुपये. एवढा खर्च तर काही देशांच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त आहे. एवढंच नव्हे, तर आजपर्यंत मानवजातीला हा पदार्थ केवळ काही नॅनोग्राम्समध्येच तयार करता आला आहे. त्याचं निर्माण करणं म्हणजे केवळ आर्थिक गुंतवणूक नाही, तर अनेक वर्षांचा संशोधन प्रवास, प्रचंड ऊर्जा आणि अत्यंत क्लिष्ट तंत्रज्ञान यांची गरज भासते.
एंटीमेटरला इतके महत्व का?
या एंटीमेटरला इतकं महत्त्व का दिलं जातं, हे जाणून घेतल्यावर त्याची किंमत योग्य वाटू लागते. कारण जेव्हा एंटीमेटर आणि सामान्य पदार्थ एकमेकांशी टक्कर घेतात, तेव्हा निर्माण होणारी ऊर्जा अणुबॉम्बच्या शक्तीपेक्षा कितीतरी पटीने अधिक असते.
म्हणजेच, याच्यामध्ये भविष्यकालीन ऊर्जा स्रोत बनण्याची प्रचंड क्षमता आहे. NASA आणि इतर संशोधन संस्थांनी यावर गंभीरपणे काम सुरू केलं आहे कारण अंतराळात लांब प्रवास करण्यासाठी हा पदार्थ उपयोगी ठरू शकतो.
आज आपण ज्या रॉकेट्सच्या साहाय्याने चंद्र, मंगळ किंवा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकांपर्यंत पोहोचतो, त्यांचं तंत्रज्ञान मर्यादित आहे. पण उद्या जर एंटीमेटरवर चालणाऱ्या यंत्रणांची निर्मिती शक्य झाली, तर माणूस त्या जागांपर्यंत पोहोचू शकेल जिथे आज फक्त कल्पना करता येते. पण त्यात एक मोठा अडथळा आहे, एंटीमेटर तयार करणं आणि त्याची साठवणूक करणं ही एक अत्यंत अवघड प्रक्रिया आहे. तो इतका अस्थिर आहे की सुरक्षित ठेवणं जवळजवळ अशक्य आहे.
आज आपण जेव्हा दागदागिने, सोनं-हिर्यांचा विचार करतो, तेव्हा आपल्याला ते खूप मौल्यवान वाटतात. पण एंटीमेटरच्या तुलनेत हे सगळं नगण्य आहे.