तुम्ही एरोस्पेस अभियांत्रिकीसारख्या रोमहर्षक क्षेत्रात करिअर करायचं स्वप्न पाहताय का? किंवा मशीन, फ्लुइड डायनॅमिक्स, ड्रोन, यंत्रांची कंपन प्रणाली आणि अंतराळ मोहिमांबद्दल नेहमीच उत्सुक असता? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. देशातील नामवंत आयआयटी संस्थांनी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी खास मोफत अभ्यासक्रमांची मालिका जाहीर केली आहे. ही संधी केवळ शिकवणारी नाही, तर तुमच्या करिअरला गती देणारी ठरू शकते. आणि हो, यासाठी कोणताही मोठा खर्चही येणार नाही.

अर्जाची शेवटची तारीख
हे सर्व अभ्यासक्रम एनपीटीईएल या भारत सरकारच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून जुलै ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने चालतील. कोर्स पूर्ण करून परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना आयआयटीकडून प्रमाणपत्र मिळेल, जे पुढे नोकरीच्या संधी किंवा उच्च शिक्षणासाठी उपयोगी ठरेल. हे कोर्सेस सहज उपलब्ध असले तरी नोंदणीची शेवटची तारीख आहे 15 ऑगस्ट 2025, त्यामुळे विलंब न करता लगेच अर्ज करावा.
फ्री कोर्स देणाऱ्या संस्था आणि अभ्यासक्रम
या यादीत आयआयटी बॉम्बे, दिल्ली, कानपूर आणि खरगपूर अशा नामवंत संस्थांचा समावेश आहे. आयआयटी बॉम्बेकडून ‘एरोस्पेस इंजिनिअरिंगचा परिचय’ आणि ‘एअरक्राफ्ट डिझाइनचा परिचय’ हे दोन अभ्यासक्रम मोफत दिले जात आहेत. हे कोर्सेस तुम्हाला एव्हिएशनच्या जगात एक पाऊल टाकण्याची तयारी करून देतील.
आयआयटी दिल्लीकडून ‘मेकॅनिकल कंपनांचे घटक’ हा अभ्यासक्रम दिला जात असून, मेकॅनिकल आणि एरोस्पेस विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय उपयुक्त आहे. मशीन आणि विमानांमध्ये निर्माण होणाऱ्या कंपनांची कारणं आणि परिणाम याबाबत येथे सखोल माहिती मिळते.
आयआयटी कानपूरने मात्र अगदी सरस ठसा उमटवला आहे. त्यांनी एक नव्हे तर अनेक अभ्यासक्रम उघडले आहेत. ‘एअरप्लेन परफॉर्मन्सचा परिचय’, ‘एअरक्राफ्ट स्टॅबिलिटी अँड कंट्रोल’, ‘फिक्स्ड विंग यूएव्ही डिझाइन’, ‘यूएव्ही डिझाइन – भाग II’, ‘एअरब्रेथिंग प्रोपल्शन’ आणि ‘अप्लाइड कॉम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स’ असे वेगवेगळ्या टप्प्यांवरचे कोर्सेस उपलब्ध आहेत. प्रत्येक अभ्यासक्रम एखाद्या खास क्षेत्राशी निगडित असून, प्रत्यक्ष इंडस्ट्रीच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन केलेला आहे. तुम्ही जर भविष्यात एव्हिएशन किंवा स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये काही करायचं ठरवलं असेल, तर हे कोर्सेस एकदम परफेक्ट आहेत.
तसेच आयआयटी खरगपूरने ‘स्पेस फ्लाईट मेकॅनिक्स’ हा अभ्यासक्रम सुरू केला आहे, जो अंतराळयानांची हालचाल, त्यांचे वेगवेगळे डायनॅमिक्स आणि गणिती मॉडेल्स याबाबत माहिती देतो. अंतराळ विज्ञानात रस असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.
नोंदणी प्रक्रिया
सर्व अभ्यासक्रमांसाठी नोंदणी प्रक्रिया एकसंध आणि सोपी आहे. इच्छुक उमेदवारांनी onlinecourses.nptel.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी आणि आवश्यक तपशील भरून नोंदणी करावी. कोर्सेस मोफत असले तरी प्रमाणपत्र परीक्षेसाठी एक नाममात्र शुल्क भरावे लागते.