आपण रोज फेसबुकवर येतो, मित्रांशी बोलतो, पोस्ट शेअर करतो, स्टोरी टाकतो… पण कधी विचार केलाय का की हे तुमचं अकाउंट फक्त तुम्हीच वापरताय का? कधी अशा काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या आहेत का ज्या थोड्या संशयास्पद वाटतात, जसं की अचानक तुमच्या प्रोफाईलवरून एखादी पोस्ट, एखादं लॉगिन नोटिफिकेशन, किंवा अपरिचित ठिकाणाहून आलेलं लॉगिन?

डिजिटल युगाने जरी आपल्याला जगाशी जोडून ठेवलं असलं, तरी तेवढाच धोका हॅकिंगचाही वाढलाय. आज एखाद्याचं फेसबुक अकाउंट वापरून माहिती चोरली जाते, फसवणूक केली जाते किंवा ओळखीचा गैरवापर होतो, हे सगळं नकळत घडतं. पण सुदैवानं, हे सगळं घडण्याआधी तुम्ही काही साध्या गोष्टी तपासून खात्री करू शकता की तुमचं अकाउंट अजूनही पूर्णपणे तुमच्याच ताब्यात आहे.
फेसबुकच्या सेटिंग्ज
सुरुवात करा तुमच्या फेसबुकच्या सेटिंग्जकडून. मोबाईल असो की लॅपटॉप, फेसबुक लॉग इन करा आणि वरच्या कोपऱ्यातील तीन ओळींवर (किंवा डाव्या साईडबारमधील मेन्यूमध्ये) क्लिक करून सेटिंग्ज आणि गोपनीयता उघडा. इथे तुम्हाला “सुरक्षा आणि लॉगिन” हा पर्याय दिसेल जिथून सगळ्या लॉगिन अॅक्टिव्हिटीचा मागोवा घेता येतो.
“Where You’re Logged In” हा विभाग खास करून पाहा. तुम्ही कुठून लॉग इन केलंय, कोणत्या डिव्हाइसवर, कोणत्या वेळेस हे सगळं स्पष्टपणे दाखवलं जातं. तुम्हाला जर यात काही अपरिचित ठिकाणं किंवा अज्ञात मोबाईल/लॅपटॉप दिसत असतील, तर लगेच सावध व्हा. याच विभागातून त्या डिव्हाइसवरून लॉगआउटही करता येतं. आणि सुरक्षित राहायचं असेल, तर ‘Log out of all sessions’ हा पर्याय निवडा आणि सर्व लॉगिन एकदम बंद करा.
यानंतर, पासवर्ड बदलणं हे पावलं खूप महत्त्वाचं. जुन्या पासवर्डच्या जागी एक मजबूत, कोणीही ओळखू न शकेल असा नवीन पासवर्ड टाका ज्यात मोठी अक्षरं, लहान अक्षरं, नंबर आणि स्पेशल कॅरेक्टर असतील.
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन
हे सगळं करूनसुद्धा पूर्ण सुरक्षित राहायचं असेल, तर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू करणं अत्यावश्यक आहे. म्हणजे कोणी तुमचं पासवर्ड ओळखलं तरी, दुसऱ्या टप्प्यावर म्हणजेच तुमच्या मोबाईलवर आलेल्या कोडशिवाय लॉगिन करणं शक्य होणार नाही. ही सुविधा “सुरक्षा आणि लॉगिन”च्या मेन्यूतच उपलब्ध आहे, आणि ती सेट करताना तुम्ही फोन नंबर किंवा ऑथेंटिकेशन अॅप वापरू शकता.
जर तुमचं अकाउंट मोठ्या प्रमाणावर लोक पाहत असतील, म्हणजेच तुमच्याकडे बरेच फॉलोअर्स असतील, तर ‘Facebook Protect’ नावाचं खास फीचर देखील चालू करता येतं. यासाठी “Facebook Protect” या सेटिंगमध्ये जाऊन फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतात, आणि त्यानंतर तुमचं अकाउंट अधिक सुरक्षित होतं.