अंबानी कुटुंबाची श्रीमंती ही फक्त त्यांच्या आलिशान बंगल्यांपुरती किंवा गाड्यांच्या ताफ्यापुरतीच मर्यादित नाही, तर त्यांची प्रत्येक हालचालही चर्चेचा विषय बनते. अगदी त्यांच्या पगाराचीही गोष्ट लोकांच्या उत्सुकतेचा भाग असते. अनंत अंबानी यांना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये कार्यकारी संचालकपदी बढती मिळाल्यानंतर त्यांना मिळणारा पगार चर्चेत आला. पण प्रश्न असा आहे, की अंबानी कुटुंबातील इतर सदस्यांना त्यांच्या भूमिकांनुसार कंपनीकडून किती मानधन दिलं जातं?
अनंत अंबानी

अनंत अंबानी यांना आता रिलायन्स इंडस्ट्रीजकडून दरवर्षी 20 कोटी रुपये पगार मिळणार आहे. यामध्ये विविध भत्त्यांसह नफ्यातील वाटाही समाविष्ट आहे. आधी ते बिगर-कार्यकारी संचालक होते, पण आता जबाबदारी वाढल्याने त्यांना पूर्णवेळ व्यवस्थापनात सामील करून घेतलं गेलं आहे. या नव्या भूमिकेमुळे कंपनीतील त्यांच्या स्थानाला अधिक बळकटी मिळाली आहे.
ईशा अंबानी
दुसरीकडे ईशा अंबानी ही रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची कार्यकारी संचालक आहे. एका उद्योग अहवालानुसार, तिला दरमहा सुमारे 35 लाख रुपये पगार दिला जातो, जो वार्षिक 4.2 कोटी रुपयांपर्यंत पोहोचतो. ती रिटेल आणि डिजिटल क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावत आहे. तिच्या नेतृत्वाखाली रिलायन्सने मोठ्या प्रमाणात विस्तार केला आहे.
आकाश अंबानी
आकाश अंबानीही याच पद्धतीने कंपनीमध्ये नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करत आहेत. त्यांच्या सहभागासाठी, त्यांना प्रत्येक बैठकीसाठी 4 लाख रुपये दिले जातात. शिवाय, 2023-24 आर्थिक वर्षात त्यांना कंपनीच्या नफ्यातून तब्बल 97 लाख रुपयांचा वाटाही मिळालाय, जो त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणेच जबाबदारीवर आधारित आहे.
मुकेश अंबानी
मात्र, या सगळ्या पगाराच्या चर्चेत मुकेश अंबानी यांची भूमिका थोडी वेगळी आहे. 2018 पर्यंत त्यांना वार्षिक 15 कोटी रुपये पगार मिळत होता. मात्र कोविडच्या काळानंतर त्यांनी स्वतःहून पगार घेणं थांबवलं, आणि आजही ते कंपनीकडून एक रुपयाही मानधन घेत नाहीत.
नीता अंबानी
नीता अंबानी या रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा असून, त्या कंपनीच्या सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी आहेत. त्या नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम पाहतात आणि त्यांना देखील सिटिंग फी व नफ्यातील वाटा दिला जातो.
अंबानी कुटुंबाची ही आर्थिक रचना फक्त पगारापुरती मर्यादित नाही, तर त्यांच्या कंपनीतील हिस्सेदारी, स्ट्रॅटेजिक निर्णय आणि व्यावसायिक दृष्टीकोन या सर्वांमध्ये ते एकत्र काम करतात. त्यामुळे, त्यांचं उत्पन्न हे केवळ एका पगाराच्या आकड्यावर थांबत नाही.