आजच्या डिजिटल जगात इंस्टाग्राम फक्त फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्याचं माध्यम राहिलेलं नाही. हे एक असं व्यासपीठ बनलंय जिथे लोक स्वतःचं एक ब्रँड तयार करतायत, लाखो फॉलोअर्स मिळवतायत आणि त्याचं रूपांतर थेट कमाईत करतायत. इंस्टाग्रामवर ‘रील्स’ हे फीचर आल्यापासून या प्लॅटफॉर्मचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. पूर्वी जेवढं कंटेंट फोटोंपुरतं सीमित होतं, ते आता छोट्या, आकर्षक व्हिडीओंमध्ये बदललं. आणि हाच बदल अनेक लोकांच्या नशिबालाही कलाटणी देणारा ठरला. घरबसल्या मोबाईलने बनवलेले काही सेकंदांचे व्हिडीओ लाखो लोकांपर्यंत पोहोचू लागले आणि त्यातून उगम झाला सोशल मीडिया इन्फ्लुएंसर संस्कृतीचा.

इंस्टाग्रामवर कमाई कशी कराल?
पण या यशामागे फक्त व्ह्यूज असतात का? जर एखाद्या रीलवर 10,000 व्ह्यूज झाले, तर लगेच पैसे मिळतात का? खरंतर हे तितकंसं सरळ नाही. केवळ व्ह्यूजच्या आधारावर इंस्टाग्राम आपोआप पैसे देत नाही. त्यासाठी तुमचं अकाउंट सक्रिय, आकर्षक आणि व्यावसायिकदृष्ट्या उपयोगी असणं आवश्यक आहे. म्हणजेच, फक्त रील्स बनवून चालत नाही, त्या रील्सवर लोकांचे लाईक्स, कमेंट्स, शेअर्स आणि तुमच्याशी जोडलेली एंगेजमेंटही महत्त्वाची असते.
इंस्टाग्रामवरून कमाईचे अनेक मार्ग आहेत. सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावी मार्ग म्हणजे ब्रँड्ससोबत भागीदारी. जर तुमचं प्रोफाइल आकर्षक असेल, फॉलोअर्सची संख्या चांगली असेल, आणि कंटेंट दर्जेदार असेल, तर कंपन्या स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधतात. त्यांच्या उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी तुम्हाला चांगली रक्कम दिली जाते. प्रत्येक रीलसाठी तुम्ही 1,000 रुपये ते 50,000 रुपये किंवा कधी कधी त्याहून अधिकही कमवू शकता. हे सगळं तुमच्या प्रभावावर आणि करारावर अवलंबून असतं.
काही देशांमध्ये इंस्टाग्रामने ‘रील्स बोनस प्रोग्राम’ सुरू केला आहे, जिथे पात्र क्रिएटर्सना आमंत्रण मिळतं आणि विशिष्ट लक्ष्य पूर्ण केल्यास त्यांना बोनस स्वरूपात पैसे दिले जातात. हे आमंत्रण मिळणं हीच मोठी संधी असते, आणि त्यानंतरच्या 30 दिवसांमध्ये क्रिएटरने आपलं काम सिद्ध करायचं असतं.
कंटेंट असतो महत्वाचा गाभा
तुमचं कंटेंट जितकं युनिक आणि लोकांच्या मनाला भिडणारं असेल, तितकं तुमचं प्रेक्षकांशी नातं मजबूत होईल. ट्रेंडिंग टॉपिकवर, करमणुकीचा, माहितीपूर्ण किंवा भावनिक पद्धतीने सादर केलेला कंटेंट लोक अधिक पसंत करतात. आणि जेव्हा लोकांशी तुमचं कनेक्शन तयार होतं, तेव्हा ब्रँड्स, प्रेक्षक आणि प्लॅटफॉर्म तिघंही तुमच्याशी जोडले जातात.