पावसाळा सुरू झाला की वातावरणात एक गारवा आणि आल्हाददायक शांती नांदायला लागते. खिडकीबाहेर सरी बरसत असतात आणि घरात चहा-कॉफीच्या कपासोबत निवांत क्षण घालवले जातात. पण या आनंददायक काळात एक अशी समस्या असते जी अनेकांच्या लक्षात येईपर्यंत फर्निचरला आतून पोखरून टाकते, ती म्हणजे वाळवी. विशेषतः लाकडी फर्निचर असलेल्या घरांमध्ये पावसाळ्याच्या आर्द्र हवामानामुळे वाळवीचा फैलाव खूप वेगाने होतो. वेळेवर उपाय न केल्यास, लाकडाचा मजबूतपणा हरवतो, आणि फर्निचर बदलण्यापर्यंत वेळ येतो.

वाळवीचं खरं रूप हे फारसं दिसत नाही, कारण त्या फार शांतपणे, कुठलाही आवाज न करता लाकडात आतून छिद्रं पाडतात. जेव्हा बाहेरून लाकूड पोकळ वाटू लागतं किंवा हाताने टकटक केल्यावर विशिष्ट आवाज येतो, तेव्हा लोकांच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. पण तोपर्यंत बरंच नुकसान झालेलं असतं. त्यामुळे वाळवीच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे लक्ष देणं आणि वेळीच उपाय करणं खूप महत्त्वाचं ठरतं.
कडुलिंबाचे तेल
सर्वात साधा आणि प्रभावी उपाय म्हणजे कडुलिंबाच्या तेलाचा वापर. नैसर्गिकरित्या कडुलिंब हे अनेक कीटकांसाठी विषासारखं असतं. या तेलात थोडंसं पाणी मिसळून स्प्रे बाटलीत भरावं आणि जिथे वाळवीचा संशय आहे तिथे फवारणी करावी. काही दिवस नियमित केल्यास वाळवीचा प्रादुर्भाव कमी होऊ लागतो आणि त्या ठिकाणी पुन्हा वाळवी राहत नाही.
बोरेक्स पावडर
अजून एक घरगुती उपाय म्हणजे बोरेक्स पावडर. ही पावडर पाण्यात मिसळून तयार केलेली जाडसर पेस्ट फर्निचरच्या वाळवीग्रस्त भागांवर लावावी. बोरेक्स वाळवीच्या पचनसंस्थेला नुकसान पोहोचवतो आणि त्यामुळे वाळवी नष्ट होतात. शिवाय, यामुळे फर्निचरला एक प्रकारचं संरक्षण कवच मिळतं, जे त्याला भविष्यातील हल्ल्यांपासूनही वाचवतं.
पांढरा व्हिनेगर आणि लिंबू रस
किचनमधलं अजून एक प्रभावी घटक म्हणजे पांढरा व्हिनेगर. लिंबाच्या रसासोबत याचे मिश्रण तयार करून ते वाळवीच्या ठिकाणी स्प्रे केल्यास, त्यांना लगेच परिणाम होतो. हे केवळ वाळवी संपवत नाही, तर त्या जागेचं निर्जंतुकीकरणही करतं म्हणजे दुहेरी फायदा मिळतो.
मात्र, या सगळ्या उपायांपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घरातल्या आर्द्रतेवर नियंत्रण ठेवणं. पावसात ओलसरपणा भिंतींमध्ये, कोपऱ्यांमध्ये किंवा जमिनीच्या फटींमध्ये साठतो आणि हीच वाळवीसाठी योग्य परिस्थिती असते. म्हणून, जर कुठे ओलावा जाणवत असेल तर तो ताबडतोब दुरुस्त करा.
पावसाळ्यात शक्यतो फर्निचर थोडा वेळ उन्हात ठेवावं. सूर्यप्रकाश वाळवींना अजिबात सहन होत नाही. त्यामुळे जर शक्य असेल तर आठवड्यातून एकदा तरी लाकडी फर्निचर घराबाहेर उन्हात ठेवा. हे ओलावा कमी करणारं आणि वाळवी रोखणारं प्रभावी पाऊल ठरतं.