जर तुम्ही मथुरा-वृंदावनच्या पवित्र भूमीत प्रथमच पाऊल ठेवणार असाल, तर ही केवळ एक यात्रा नाही, तर तुमच्या जीवनातील एक अनोखी आध्यात्मिक अनुभूती ठरू शकते. प्रेम, श्रद्धा आणि भक्तीने भारलेल्या या भूमीत एक पवित्र कंपन असतो, ज्याला अनुभवण्यासाठी मनही शुद्ध असावं लागतं. प्रेमानंद जी महाराज , ज्यांचे वाणीमधून निघणारे शब्द बालकांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करतात यांनी मथुरा-वृंदावनच्या या अध्यात्मिक प्रवासासाठी काही मार्गदर्शक नियम सांगितले आहेत, जे प्रत्येक भक्ताने लक्षात ठेवावेत.

एका भाविकाने प्रेमानंद जी महाराजांना विचारले की, “जर कोणी पहिल्यांदाच वृंदावनला जात असेल, तर काय करावं?” यावर महाराजांनी अगदी सहजपणे, पण खूप खोल अर्थाने उत्तर दिलं “देवाचे नाव जपा.” त्यांनी स्पष्ट केलं की कृष्णनामाचं उच्चारण केल्याने मन निर्मळ होतं, आणि जेव्हा मन पवित्र असतं, तेव्हा आपण धामात आहोत याची जाणीव आपोआप होते. इथे केवळ पायाने चालत येणं महत्त्वाचं नाही, तर मनाने देखील येथे पोहोचणं तितकंच गरजेचं आहे.
काय करू नये?
मथुरा-वृंदावन ही केवळ शहरं नाहीत, ती स्वयं भगवंताच्या चरणांची आठवण करून देणारी भूमी आहे. त्यामुळे इथे आलो की दुसऱ्यांमधील दोष, चुका किंवा दुर्बलता पाहण्यात वेळ घालवू नये, असं महाराज सांगतात. जर कोणी तुमच्यासमोर काही गैर वागत असेल, तरी त्यांच्यावर टीका न करता स्वतःच्या साधनेत लक्ष देणं ही खरी तपश्चर्या आहे. कारण धामात येऊन इतरांची निंदा करणं, म्हणजे त्या पवित्रतेचा अपमानच ठरेल.
काय करावे?
महाराजांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट नमूद केली, ब्रह्मचर्य. ते म्हणतात की धामात काही काळ वास्तव्य करत असाल, तर गृहस्थ जीवनाचे बंधन तात्पुरते सोडून, पूर्णपणे कृष्णनामात तल्लीन होणं गरजेचं आहे. एक-दोन दिवस का होईना, पण शरीर, मन आणि इंद्रियांचं संयम राखणं, म्हणजेच खऱ्या अर्थाने देवाजवळ जाण्याचा मार्ग आहे.
या भूमीत केवळ स्वतःच्या मोक्षाचा विचार न करता, सेवा आणि परोपकाराची भावना ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रेमानंद जी महाराज म्हणतात की पैशाची मुबलकता नसली तरी ज्या थोड्याशा गोष्टी करता येतील, त्या नक्की करा. उदा. पक्ष्यांना धान्य घालणं, संतांना मीठ दान करणं, किंवा गरजूंना थोडं अन्न देणं. इथं केलेल्या प्रत्येक कृतीला अनंतपटीने फळ मिळतं, असं मानलं जातं.