अमरनाथ यात्रा म्हणजे केवळ एक धार्मिक प्रवास नाही, ती एक आध्यात्मिक अनुभूती आहे. हिमाच्छादित डोंगररांगांमध्ये वसलेली बाबा बर्फानींची ही गुहा प्रत्येक भाविकासाठी भक्ती, श्रद्धा आणि आस्था यांचं प्रतीक आहे. दरवर्षी हजारो भाविक कठीण प्रवास करत या पवित्र स्थळी पोहोचतात, आणि बर्फापासून साकार झालेलं शिवलिंग पाहून त्यांच्या मनात एक अलौकिक शांतता आणि समाधान निर्माण होतं. मात्र या गुहेचा आणखी एक गूढ पैलू आहे एक रहस्यमय कबुतरांची जोडी, जी प्रत्येकाला दिसतेच असं नाही.

अमरनाथ गुहेत दरवर्षी नैसर्गिकरित्या निर्माण होणारं बर्फाचं शिवलिंग एक अद्भुत चमत्कार मानला जातो. या लिंगाची रचना पूर्णतः बर्फापासून होते आणि तेही कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय. म्हणूनच या शिवलिंगाला ‘स्वयंभू’ म्हणून ओळखलं जातं. अशी श्रद्धा आहे की या शिवलिंगाचं दर्शन घेतल्याने मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो आणि त्याच्या सर्व पापांचं शमन होतं. पण याच गुहेशी निगडित एक अशी कथा आहे जी भक्तांच्या मनात अद्भुत कुतूहल निर्माण करते ती म्हणजे गुहेत दिसणाऱ्या कबुतरांच्या जोडप्याची.
कबुतरांची कथा
या कथेनुसार, अमरनाथ गुहा ही ती जागा आहे जिथं भगवान शिवांनी माता पार्वतीला मोक्षाचा आणि अमरत्वाचे रहस्यपूर्ण ज्ञान दिलं होतं. एकदा माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारलं की अमरत्व म्हणजे नेमकं काय, आणि त्याचं रहस्य काय आहे. तेव्हा भगवान शिव तिला घेऊन गेले एका अत्यंत शांत आणि निर्जन अशा जागी, जी होती अमरनाथची गुहा. त्यांनी आपल्या शरीरावरील सर्व आभूषणे, वाघाचं कातडं आणि इतर वस्त्रं एक एक दूर करून त्या गुहेत प्रवेश केला, कारण त्यांना हा संवाद पूर्णतः गोपनीय ठेवायचा होता.
याच क्षणी, त्या गुहेत कबुतरांची एक जोडी आधीच उपस्थित होती. त्यांनीही साऱ्या गोष्टी ऐकल्या, अगदी अमरत्वाचं रहस्य देखील. असं मानलं जातं की हे अमृतज्ञान ऐकल्यामुळे ती कबुतरांची जोडी अमर झाली. आजही भाविक असं सांगतात की हीच जोडी अमरनाथच्या गुहेत दरवर्षी दिसते, एकसंध आणि शांत.
भाग्यवान भविकांनाच होते दर्शन
या गोष्टीचा आणखी एक अद्भुत पैलू म्हणजे, अमरनाथ गुहा ज्या उंचीवर आहे, तिथं ऑक्सिजन फारच कमी असतो. तसंच, अन्न-पाण्याचं कोणतंही नैसर्गिक साधन त्या ठिकाणी नाही. तरीही, ही कबुतरांची जोडी तिथं तग धरते आणि कधीही गुहेच्या बाहेर जात नाही. हाच तो चमत्कार आहे जो भाविकांना अंतर्मनापासून स्पर्श करतो.
पण प्रत्येक भाविकाला ही जोडी दिसेलच असं नाही. असं मानलं जातं की केवळ भाग्यवान, ज्यांचं मन पूर्णतः भक्तीने भरलेलं आहे, ज्यांच्या श्रद्धेत कुठलाही संदेह नाही, अशा लोकांनाच या अमर कबुतरांचं दर्शन होतं. हे दर्शन मिळणं म्हणजे बाबांच्या आशीर्वादाची एक जिवंत खूण मानली जाते.