सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अपारदर्शकता दूर करण्यासाठी आणि गरजूंना मोफत धान्याचा लाभ वेळेवर मिळावा यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आता मोफत रेशनसाठी आधार कार्ड आणि रेशन कार्ड एकत्र लिंक करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. हे काम अगदी सोपं असून तुम्ही घरबसल्या, मोबाईल किंवा संगणकावर फक्त दोन मिनिटांत ते करू शकता.
आधार लिंक बंधनकारक

या मोहिमेचा मुख्य उद्देश अगदी स्पष्ट आहे. बनावट रेशन कार्ड बंद करून, खऱ्या गरजू लोकांपर्यंतच धान्य पोहोचवायचं. अनेक वेळा असं दिसून आलं की एकाच व्यक्तीच्या नावावर एकापेक्षा जास्त कार्ड्स असतात, ज्यामुळे इतर गरजूंना धान्याचा लाभ मिळत नाही. आधार लिंकिंगने ही समस्या कायमची दूर होणार आहे.
‘असं’ करा आधार लिंक
जर तुम्ही अजूनही हे काम केलं नसेल, तर काळजी करू नका. ही प्रक्रिया खूपच सोपी आणि घरबसल्या करता येण्यासारखी आहे. सुरुवातीला तुम्हाला तुमच्या राज्याच्या रेशन कार्ड पोर्टलवर जावं लागेल. प्रत्येक राज्याचं स्वतंत्र पोर्टल असतं जसं महाराष्ट्रासाठी https://mahadiscom.in, उत्तर प्रदेशसाठी https://fcs.up.gov.in, बिहारसाठी https://epds.bihar.gov.in वगैरे. तुम्ही गुगलवर “<तुमचं राज्य> रेशन कार्ड पोर्टल” असं शोधून लिंक मिळवू शकता.
पोर्टलवर गेल्यावर, रेशन कार्ड नंबर, नाव, आणि इतर तपशील टाकून लॉगिन करा. नंतर ‘e-KYC’ किंवा ‘आधार e-KYC’ हा पर्याय निवडा. या टप्प्यावर, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक द्यावा लागेल, आणि त्यावर OTP येईल जो तुम्ही भरलात की पुढचं पाऊल सुरू होतं.
आवश्यक कागदपत्रं
काही राज्यांमध्ये तुम्हाला एक अलीकडचा फोटो आणि आधार, ओळखपत्र, रहिवास प्रमाणपत्र अपलोड करावी लागतील. हे केल्यानंतर, तुम्ही ‘सबमिट’ बटणावर क्लिक केलं की, तुमचं ई-केवायसी पूर्ण झाल्याचं लगेच स्क्रीनवर दिसेल. यासोबतच, फोनवरही मेसेज येईल.
ही प्रक्रिया एकदा पूर्ण केली की, तुम्हाला तुमच्या शिधापत्रिकेवर मोफत रेशन मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. उलट, ही कृती वेळेवर केली नाही, तर भविष्यात रेशन मिळणं थांबू शकतं.