नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 2025 च्या हेन्ली पासपोर्ट इंडेक्सने सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जातेय. एकीकडे पाकिस्तानचा पासपोर्ट रँकिंगमध्ये वर सरकत आहे, तर दुसरीकडे भारताचे स्थान थोडं घसरलेलं दिसत आहे. दोन्ही शेजारी देश आणि त्यांच्या प्रवासस्वातंत्र्याच्या शक्यता पाहता ही बाब विशेष लक्षवेधी ठरते. देशाचं पासपोर्ट रँकिंग केवळ आकड्यांमधली बातमी नाही, तर सामान्य नागरिकांच्या जगण्यावर थेट परिणाम करणारा विषय आहे.
पाकिस्तानचे स्थान

पाकिस्तानने यंदा एक महत्त्वाचा टप्पा पार करत 100 वं स्थान पटकावलं आहे. हे त्या देशासाठी मोठं पाऊल मानलं जात आहे कारण 2021 मध्ये त्यांचं स्थान 113 वं होतं. म्हणजेच चार वर्षांत पाकिस्तानने 13 स्थानांची झेप घेतली आहे. या प्रगतीमागे काही विशिष्ट देशांशी झालेल्या करारांचे आणि प्रवाससवलतींचे योगदान आहे.
आता पाकिस्तानी नागरिकांना 32 देशांमध्ये व्हिसाशिवाय किंवा ‘व्हिसा ऑन अरायव्हल’सह प्रवेश मिळू शकतो. यामध्ये काही आशियाई आणि आफ्रिकन देशांचा समावेश आहे, जसे की मालदीव आणि कतार. मात्र, अमेरिका, युरोप किंवा ऑस्ट्रेलियासारख्या प्रमुख देशांमध्ये ही सुविधा अजूनही उपलब्ध नाही.
या बदलांमुळे पाकिस्तानात एक प्रकारचा सकारात्मक उत्साह पसरलेला आहे. सरकार आणि माध्यमं हे रँकिंग एका यशस्वी धोरणाचा भाग मानत आहेत. इमिग्रेशन विभागाचे महासंचालक मुस्तफा जमाल काझी यांनीदेखील याचे श्रेय सरकारी प्रयत्नांना दिलं आहे. त्यामुळे देशात ही बाब मोठ्या अभिमानाने साजरी केली जात आहे.
भारताची रॅंकिंग घसरली
मात्र, भारतासाठी ही वेळ थोडी काळजीची ठरली आहे. भारत यंदा 82 व्या स्थानी आहे, जे गेल्या वर्षीपेक्षा 2 स्थानांनी घसरलेलं आहे. अर्थात पाकिस्तानच्या तुलनेत भारत अजूनही 18 स्थानांनी वर आहे, पण भारतीय पासपोर्टधारकांसाठी अशा प्रकारची घसरण चिंतेची बाब मानली जात आहे. भारताच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय प्रभावाला हे रँकिंग फारसं शोभेसं वाटत नाही.
इतर देशांचे स्थान
हेन्ली पासपोर्ट इंडेक्स दरवर्षी नागरिकांना किती देशांत प्रवासासाठी व्हिसा लागत नाही याच्या आधारे रँकिंग ठरवतं. सध्या सिंगापूर, जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स, जर्मनी, इटली अशा देशांचे पासपोर्ट जगात सर्वात प्रभावशाली मानले जातात. या देशांचे नागरिक जवळपास 190 देशांमध्ये अगदी सहजतेने प्रवास करू शकतात.
आशिया खंडात पाहायचं झाल्यास, नेपाळ पाकिस्तानच्या अगदी एक स्थान वर म्हणजे 99 व्या स्थानी आहे. इराक 101 व्या, सीरिया 102 व्या आणि अफगाणिस्तान 103 क्रमांकवर आहे.