भारतीय लष्कराने आपल्या ताकदीत अशी भर घातली आहे की शत्रूंच्या मनात भीती निर्माण होणं स्वाभाविक आहे. भारतीय सैन्याची ‘ATAGS’ ही तोफ, म्हणजेच ‘अॅडव्हान्स्ड टोव्ड आर्टिलरी गन सिस्टम’, आता एका नव्या स्वरूपात समोर आली आहे. अधिक ताकदवान, अधिक अचूक आणि प्रचंड घातक. याची मर्यादित माहिती आत्तापर्यंत होती, पण आता या तोफेची खरी ताकद उलगडू लागली आहे. चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांनाही याची कल्पना येताच त्यांचीहि धास्ती वाढली आहे.

ATAGS तोफ
ATAGS ही केवळ एक तोफ नाही, ती भारताचं आधुनिक युद्धशास्त्रातील ब्रह्मास्त्र आहे. सध्या ती सुमारे 48 किलोमीटर अंतरावर अचूक मारा करू शकते, पण याचं खरं रूप अजून उलगडलं नाहीय. पुढील काही काळात ही तोफ 80 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरून निशाणा साधू शकेल, ही बातमी समोर येताच जागतिक संरक्षण तज्ज्ञांचं लक्ष भारताकडे वळलं आहे. युद्धभूमीवर ही ताकद म्हणजे शत्रूच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासारखं आहे.
या तोफेमध्ये जी नवी भर पडतेय ती म्हणजे डीआरडीओच्या आर्ममेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (ARDE) विभागाकडून तयार होणारे ‘स्मार्ट शेल्स’. हे दारुगोळे सामान्य नाहीत. त्यामध्ये जीपीएस, भारतीय नेव्हिगेशन सिस्टिम ‘नाविक’ आणि लेझर मार्गदर्शन असणार आहे. म्हणजे शत्रू कितीही लपला तरी त्याच्या बंकरवर अचूक मारा होणारच. या तंत्रज्ञानामुळे लक्ष्य ओळखण्यात आणि निशाणा लावण्यात चुका होण्याची शक्यता जवळपास नाहीशी होते.
रामजेट तंत्रज्ञान
रामजेट तंत्रज्ञानाचा वापर या दारुगोळ्यात केला जातोय, जो अगदी मिसाइलच्या वेगाने आणि सुस्पष्टतेने काम करतो. यामुळे शेल इतक्या लांब अंतरावरूनही आपला वेग आणि शक्ती टिकवून ठेवतील. ही तांत्रिक उडी केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण आशिया खंडाला सुरक्षा क्षेत्रात नव्या उंचीवर नेणारी ठरेल.
ATAGS तोफांची पहिली रेजिमेंट मार्च 2027 पर्यंत भारतीय लष्करात दाखल होणार आहे. एका रेजिमेंटमध्ये सुमारे 18 तोफा असतील आणि प्रत्येक तोफ ही शत्रूच्या अनेक योजनेला एकाच वेळी धक्का देण्याची क्षमता बाळगून असेल. हे शस्त्र सीमारेषेवर तैनात झाल्यानंतर, विशेषतः पाकिस्तानसारख्या देशासाठी तीव्र सावधतेचा इशारा ठरणार आहे.
सगळ्यात अभिमानास्पद गोष्ट म्हणजे हे संपूर्ण शस्त्र भारतातच तयार झालं आहे. भारत फोर्ज आणि टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्ससारख्या भारतीय कंपन्यांनी ATAGS तयार केली आहे. कोणत्याही परदेशी तंत्रज्ञानाची गरज न पडता, हे संपूर्णपणे स्वदेशी आहे जे भारताच्या आत्मनिर्भर लष्करी धोरणाचं यश आहे.