भारताच्या सैनिकी ताकदीमध्ये सध्या एक नवे बळ भरले जात आहे आणि यामागे कारण आहे ऑपरेशन सिंदूरनंतर निर्माण झालेली गरज आणि जागरूकता. जेव्हा भारतीय हवाई दल आणि लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून त्याच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या, तेव्हा हे केवळ एक सामरिक यश नव्हतं, तर एक संदेश होता की भारत आता केवळ सहन करणार नाही, तर प्रत्युत्तरही देणार. याच यशामागे जी शस्त्रं महत्त्वाची ठरली, त्यातील एक म्हणजे 105 मिमी लाईट फील्ड गन आणि आता त्याची मागणी इतकी वाढली आहे की भारताने त्याचं उत्पादन दुपटीने वाढवायचं ठरवलंय.

105 मिमी लाईट फील्ड गन
जबलपूर येथील गन कॅरेज फॅक्टरी ही भारताच्या तोफखान्याचं हृदय मानली जाते. इथेच 1978 पासून 105 मिमीच्या गनचं उत्पादन सुरू आहे. पूर्वी ही फॅक्टरी वर्षाला 18 गन तयार करत होती. मात्र, ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय लष्कराच्या गरजा लक्षात घेता, आता तीच फॅक्टरी वर्षाला 36 गन तयार करणार आहे. या गनची खासियत म्हणजे तिचं हलकं वजन आणि ती सहजपणे दोन ते तीन भागांमध्ये मोडता येणं, ज्यामुळे ती हेलिकॉप्टरने उंच पर्वतीय भागातही सहज तैनात करता येते.
ही लाईट फील्ड गन एका मिनिटात 6 धडाकेबाज फायर करू शकते, आणि तिची मारकक्षमता 17 किलोमीटरपर्यंत पोहोचते. तिच्या वापरासाठी फक्त दोन सैनिक पुरेसे असतात एक तोफ डील करणारा आणि दुसरा लोडर. एवढंच नव्हे, तर ती 2,380 किलो वजनाची असून, खडबडीत भागांत देखील सहज वाहून नेता येते. ही गन शत्रूच्या बंकर, चौक्या आणि हालचालींवर अत्यंत अचूकतेने प्रहार करू शकते, हेच तिचं यशाचं गमक आहे.
‘धनुष’ आणि ‘सारंग’ तोफा
याच कारखान्यात आता ‘धनुष’ आणि ‘सारंग’ या जड तोफांचंही उत्पादन जोरात सुरू आहे. ‘धनुष’ ही जगप्रसिद्ध बोफोर्स तोफेची स्वदेशी आवृत्ती असून, तिची रेंज 38 किलोमीटरपर्यंत आहे. ती पूर्णतः स्वयंचलित असून, ती कोणत्याही परिस्थितीत वापरता येते. हेच भारताच्या स्वदेशी लष्करी उत्पादन क्षमतेचं जिवंत उदाहरण आहे. याशिवाय, ‘सारंग’ तोफाही लष्करात आता मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे.
सैन्याच्या दृष्टीने ही सगळी प्रगती केवळ यंत्रसामग्रीत नाही, तर आत्मविश्वासात आहे. भारत आता स्वतःची शस्त्रं निर्माण करतोय, स्वतःच्या गरजेनुसार त्यांचं उत्पादन वाढवतोय आणि युद्धभूमीवर अधिक सक्षम बनतोय. ऑपरेशन सिंदूर हा एक वळणबिंदू ठरला, ज्यामुळे भारताने नवे शस्त्रनिर्मिती धोरण आखलं.