अंतराळाकडे पाहताना आपण अनेकदा स्वप्न बघतो, पृथ्वीपासून हजारो किलोमीटर दूर जाऊन, आकाशात तरंगत, आपल्या निळ्याशार ग्रहाकडे नजरेनं पाहणं. ही फक्त कल्पनाच वाटते. पण जेव्हा हे स्वप्न कोणीतरी आपल्या देशासाठी साकार करतं, तेव्हा अभिमानाचा क्षण ओघानं येतो. नुकताच असाच एक क्षण अनुभवला गेला, जेव्हा ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय बनले.

अॅक्सिओम AX-4 मोहीम
शुभांशू शुक्ला यांचा प्रवास हा केवळ वैज्ञानिक कामगिरी नव्हे, तर तो भारताच्या अंतराळ क्षेत्रातील आत्मविश्वासाचा एक ठळक दाखला ठरला आहे. अॅक्सिओम स्पेसच्या AX-4 या खासगी मोहिमेत पायलट म्हणून सहभागी झालेल्या शुभांशू यांनी 25 जून 2025 रोजी फ्लोरिडा येथून स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेटमधून उड्डाण केलं. अवघ्या 28 तासांच्या प्रवासानंतर, त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 26 जूनला आयएसएसमध्ये प्रवेश केला आणि भारताच्या अंतराळ मोहिमेच्या इतिहासात एक नवीन पान लिहिलं गेलं.
या मोहिमेत शुभांशू यांच्यासोबत अमेरिकेच्या अनुभवी अंतराळवीर पेगी व्हिटसन, पोलंडचे शास्त्रज्ञ स्लावोश उझनान्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हेही सहभागी होते. हे चारही अंतराळवीर एका अत्यंत महत्त्वाच्या वैज्ञानिक प्रयोगात गुंतलेले आहेत.
मोहिमेचा उद्देश
या मोहिमेचा उद्देश अवकाशातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा माणसाच्या स्नायूंवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणं आहे. यातून भविष्यात दीर्घकाळ अंतराळात राहण्यासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय आणि जैविक ज्ञानाचा पाया मजबूत केला जात आहे.
शुभांशू शुक्ला यांचे अवकाशातून पाठवलेले फोटो केवळ एक वैज्ञानिक दस्तऐवज नाहीत, ते भावनेचे, प्रेरणेचे आणि अभिमानाचे प्रतिबिंब आहेत. आयएसएसच्या ‘क्युपोला’ नावाच्या दृश्य कॅप्सूलमध्ये बसून त्यांनी पृथ्वीच्या दिशेनं पाहिलेला क्षण आणि त्यांच्या मागे दिसणारी निळसर पृथ्वी या छायाचित्रांमधून एक आगळीच जादू झळकते. भारत सरकारने हे फोटो X वर शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.