जेव्हा देशाच्या सीमांवर संकट घोंगावत असते, तेव्हा त्याला तोंड देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं कवच लागते. भारताने काही वर्षांपूर्वी रशियाकडून घेतलेल्या S-400 हवाई संरक्षण प्रणालीने हे सिध्द केलं होतं की, आक्रमणाचं प्रत्युत्तर केवळ सामर्थ्याने नव्हे तर युक्तीनेही देता येतं. ऑपरेशन सिंदूरच्या काळात पाकिस्तानने भारताच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागली, पण S-400 ने त्यांचा अचूक वेध घेतला आणि शत्रूचा डाव उधळून लावला. या यशामुळे भारताच्या हवाई संरक्षण क्षमतेवर जगाचं लक्ष वेधलं गेलं आणि शेजारील देशांची झोपही उडाली.

S-500
S-400 च्या या प्रभावी कामगिरीनंतर भारताने थांबण्याऐवजी पुढे पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आता भारताची नजर S-500 या आणखी प्रगत आणि भेदक हवाई संरक्षण प्रणालीकडे वळली आहे. जर ही प्रणाली भारताच्या ताफ्यात आली, तर केवळ पाकिस्तानच नव्हे तर चीनसुद्धा भारताशी पंगा घेण्याआधी शंभर वेळा विचार करेल. कारण S-500 ही प्रणाली S-400 पेक्षा अधिक लांब अंतरावरून हल्ला करणाऱ्या लक्ष्यांना पाडू शकते आणि ती अंतराळातून येणारे धोकेही ओळखू शकते.
आज भारताकडे आधीच S-400 चे तीन स्क्वॉड्रन कार्यरत आहेत, ज्यांना ‘सुदर्शन चक्र’ असे नाव देण्यात आले आहे. ही प्रणाली 380 किलोमीटरच्या परिघात कुठलेही शत्रू विमान, क्षेपणास्त्र किंवा ड्रोन पाडण्याची क्षमता ठेवते. या सामर्थ्यामुळे पाकिस्तानच्या हवाई शक्तीला मोठा धक्का बसला आहे. आता उरलेले दोन स्क्वॉड्रन मिळवण्यासाठी भारत सज्ज आहे, पण रशिया-युक्रेन युद्धामुळे डिलिव्हरीस विलंब झाला होता. तरीही रशियाने पुढील आर्थिक वर्षात ही प्रणाली भारतात पोहोचवण्याचं आश्वासन दिलं आहे.
स्वदेशी प्रकल्प ‘कुशा’
भारत आता स्वदेशी प्रकल्प ‘कुशा’वरही काम करत आहे, जो दीर्घ पल्ल्याच्या हवाई संरक्षणासाठी तयार केला जात आहे. मात्र, त्यात अपेक्षित प्रगती न झाल्यामुळे सध्या तरी भारताचं S-400 वरच अधिक अवलंबित्व आहे. DRDO, भारत डायनॅमिक्स आणि सोलर डिफेन्स यासारख्या संस्था एकत्रितपणे या प्रकल्पावर काम करत आहेत. भविष्यात प्रकल्प कुशा यशस्वी झाल्यास भारत स्वतःची प्रणाली तयार करण्याच्या मार्गावर असेल.
भारत आणि रशियामधील संरक्षण सहकार्य गेल्या काही दशकांत अधिक मजबूत झाले आहे. S-500 सारख्या महत्त्वाच्या प्रणालीसाठी भारताने रस दाखवला असून, यासाठी रशियाच्या उच्चस्तरीय मान्यतेची गरज आहे. जर भारताला S-500 मिळाले, तर तो केवळ क्षेत्रीय नव्हे तर जागतिक सामरिक समतोल बदलवू शकतो.