आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे मेंदू, जो केवळ विचार करणे , निर्णय घेणे आणि आठवणी टिकवतो इतकंच नाही. तर आपल्या संपूर्ण शरीराचं नियंत्रणही त्याच्याकडे असतं. पण कधी कधी आपण त्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. हलकंसं डोके दुखणं, थोडंसं विसरणं किंवा थकवा येणं ही लक्षणं अनेकदा आपण सामान्य समजून दुर्लक्ष करतो. मात्र, हीच लक्षणं काही वेळा मेंदूमध्ये रक्ताची कमतरता दर्शवणारी असू शकतात आणि भविष्यात गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकतात.

थकवा
मेंदू निरंतर कार्यशील ठेवण्यासाठी त्याला भरपूर ऑक्सिजन आणि पोषणद्रव्यांची गरज असते, जी रक्ताद्वारे त्याच्यापर्यंत पोहोचतात. पण जेव्हा याच रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होतो, तेव्हा सुरुवातीला दिसणारी लक्षणं फारच सूक्ष्म असतात. सतत थकवा जाणवणं ही त्यातील एक महत्वाची सूचना असते. काहीही विशेष शारीरिक मेहनत न करता सुद्धा जर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल, तर हे मेंदूला कमी प्रमाणात ऑक्सिजन मिळत असल्याचं संकेत असू शकतो.
डोकेदुखी
डोकेदुखी हा आणखी एक असा त्रास आहे जो आपण वारंवार गृहीत धरतो. पण मेंदूमध्ये पोषकद्रव्यांचा तुटवडा झाला की ‘ब्रेन फॉग’ सारख्या अवस्थेमुळे डोके जड होऊ शकतं आणि त्यामुळे अचानक डोकेदुखी सुरु होते. हा प्रकार नियमित होत असल्यास त्याकडे गांभीर्याने पाहणं आवश्यक आहे.
अचानक चक्कर येणे
अचानक चक्कर येणे, डोळ्यासमोर अंधुक दिसू लागणे किंवा क्षणभर तोल जाणे ही लक्षणं आपल्या मेंदूपर्यंत पुरेसं रक्त पोहोचत नसल्याचं स्पष्ट लक्षण असू शकतात. याला बरेचदा आपण थकवा, झोपेचा अभाव किंवा स्ट्रेस समजतो, पण वारंवार ही लक्षणं जाणवत असतील तर वैद्यकीय सल्ला घेणं टाळू नका.
स्मरणशक्ती कमजोर होणं
स्मरणशक्ती कमजोर होणं हा आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीचा भाग वाटतो, पण यामागे मेंदूतील रक्ताभिसरणातील अडचण हे देखील एक कारण असू शकतं. लहानसहान गोष्टी वारंवार विसरणं, कोणाची नावं आठवण्यात अडचण येणं, किंवा झालेली कामं लक्षात न राहणं हेही मेंदूमधील पोषणाच्या कमतरतेचे गंभीर संकेत आहेत.
अपचन
याशिवाय, मेंदूमध्ये रक्ताची कमतरता शरीराच्या चयापचय प्रक्रियेवरही परिणाम करते. अनेकांना भूक लागत नाही, किंवा त्यांचं पचन नीट होत नाही. यामागचं कारण पोटात काही बिघाड नसून, मेंदूपर्यंत पोहोचणाऱ्या रक्ताच्या प्रमाणात झालेली घट असू शकते.
एकूणच, आपल्या मेंदूने जर मदतीचा इशारा दिला, तर तो ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ही सुरुवात आहे. जर वेळेत लक्ष दिलं नाही, तर हीच लक्षणं स्ट्रोक, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स किंवा डिमेन्शियासारख्या गंभीर आजारांचं रुप धारण करू शकतात.