नात्यांच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं आपण म्हणतो, पण त्या धरून ठेवण्याची कला पृथ्वीवरच शिकावी लागते. काही लोक असतात, जे बाहेरून खूप गंभीर आणि मजबूत दिसतात, पण प्रेम आणि भावना व्यक्त करणं त्यांच्या स्वभावात नसतं. मूलांक 1 असलेले लोक अशाच प्रकारात मोडतात. त्यांचं आयुष्य बाहेरून तेजस्वी सूर्याप्रमाणे दिसतं, पण आतून ते खूप संवेदनशील असतात. त्यांच्या वैवाहिक आयुष्याचा वेध घेताना हे स्पष्ट जाणवतं की ते जितके करिअरमध्ये यशस्वी असतात, तितकेच ते प्रेमाच्या बाबतीत गोंधळलेले असू शकतात.
मूलांक 1

ज्यांचा जन्म महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेला होतो, त्यांना मूलांक 1 असतो. सूर्य हा त्यांचा अधिपती ग्रह असल्यामुळे हे लोक आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि स्पष्ट धोरणांसाठी ओळखले जातात. त्यांचा स्वभाव ठाम असतो. ते निर्णय घेताना कुणावरही अवलंबून राहत नाहीत. पण त्याच वेळी, या स्वभावामुळे ते नात्यांमध्ये जवळीक निर्माण करण्यात कमी पडतात. प्रेमात भावना व्यक्त करणं ही त्यांच्यासाठी कठीण गोष्ट असते. मनात खूप काही असतं, पण ते ओठांवर कधीच येत नाही. त्यामुळे त्यांच्या जोडीदाराला कधी कधी असं वाटू शकतं की ते दूर आहेत, मनापासून जोडलेले नाहीत.
हे लोक प्रेमाच्या बाबतीत फारसे प्रयोगशील नसतात. त्यांचं प्रेम एकदा ठरलं की ते शेवटपर्यंत त्याच नात्यात गुंतलेले राहतात. पण प्रेम व्यक्त करताना ते जेवढं सहज आणि मोकळेपणानं बोलावं, तेवढं त्यांच्याकडून होत नाही. त्यामुळे अनेक वेळा गैरसमजांची शक्यता वाढते. त्यांच्या आयुष्यात करिअर ही सगळ्यात मोठी प्राथमिकता असते. आपल्या यशासाठी ते नात्यांना दुय्यम स्थान देऊ शकतात. यामुळे प्रेमविवाह त्यांच्या आयुष्यात फारसे सहजपणे घडत नाहीत. अनेक वेळा ते पालकांच्या पसंतीनुसारच लग्न करतात, किंवा कधी कधी लग्नच टाळतात.
मूलांक 1 चा स्वभाव
मूलांक 1 असलेल्या लोकांचा स्वभाव थोडा वर्चस्व गाजवणारा असतो. त्यांना प्रत्येक गोष्ट आपल्या पद्धतीनं आणि नियंत्रणात हवी असते. त्यामुळे त्यांच्या जोडीदाराने समजूतदार असणं खूप गरजेचं असतं. जे मूलांक 2,3,4,5,8 आणि 9 चे लोक असतात, ते या स्वभावाशी जुळवून घेऊ शकतात. हे लोक मूलांक 1 च्या धडाडीला समजून घेत त्यांना समतोल ठेवण्याचं काम करतात. अशा नात्यांमध्ये प्रेम आणि सामंजस्य यांचा सुंदर समन्वय दिसतो.
या लोकांचं वैवाहिक आयुष्य यशस्वी होण्यासाठी त्यांना थोडं मोकळं होणं आवश्यक आहे. भावना व्यक्त करणं, समोरच्याचं म्हणणं ऐकणं आणि थोडीशी लवचीकता हे त्यांच्या नात्यांना अधिक मजबूत करू शकतं. त्यांचं प्रेम खोल असतं, फक्त ते शब्दात उतरवण्याची त्यांची शैली थोडी वेगळी असते. त्यांच्या जोडीदाराने हे समजून घेतल्यास ते नातं अधिक अर्थपूर्ण ठरू शकतं.