वाढत्या महागाईच्या युगात भविष्याची आर्थिक तयारी करणे ही गरज बनली आहे. अनेक लोक बचतीची सुरुवात करतात, पण वेळोवेळी गुंतवणुकीची रक्कम वाढवायची गरज लक्षात घेत नाहीत. याच पार्श्वभूमीवर “स्टेप-अप SIP” म्हणजेच गुंतवणुकीत हळूहळू वाढ करण्याची योजना, अनेकांसाठी फायदेशीर ठरते. ही योजना केवळ बचतीला चालना देत नाही, तर भविष्यातील मोठ्या निधीसाठी सशक्त पाया रचते.

स्टेप-अप SIP म्हणजे?
स्टेप-अप SIP म्हणजे काय, हे समजून घेणं खूप सोपं आहे. आपण दरमहा ठराविक रक्कम SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवतो, त्यालाच SIP म्हणतात. मात्र स्टेप-अप SIP मध्ये दरवर्षी किंवा ठराविक कालावधीनंतर ही रक्कम आपण वाढवत जातो. उदाहरणार्थ, सुरुवातीला जर आपण 10,000 रुपयांची SIP सुरू केली आणि दरवर्षी 10% वाढ केली, तर पुढील वर्षी तीच रक्कम 11,000 रुपये होते. या पद्धतीने तुम्ही तुमच्या पगारातील वाढ लक्षात घेऊन हळूहळू जास्त रक्कम गुंतवू शकता, ज्याचा तुम्हाला दीर्घकाळात मोठा फायदा मिळतो.
या पद्धतीचा मुख्य फायदा म्हणजे सुरुवातीला गुंतवणुकीचा भार कमी असतो, आणि जसे उत्पन्न वाढते तसे SIP वाढवून भविष्यातील निधी तयार करता येतो. यामुळे आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करणे सोपे जाते. जसे की घर खरेदी, मुलांचे शिक्षण, निवृत्तीचे नियोजन इत्यादी.
‘स्टेप-अप SIP कॅल्क्युलेटर’
तुमच्या स्टेप-अप SIP चा अंदाज लावण्यासाठी ‘स्टेप-अप SIP कॅल्क्युलेटर’ हे टूल वापरता येते. हे कॅल्क्युलेटर वापरून तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा अंदाजे परतावा, वाढीचा दर आणि कालावधी समजून घेऊ शकता. यामध्ये सुरुवातीची रक्कम, दरवर्षी किती टक्के वाढ करायची आहे, आणि किती वर्षे गुंतवणूक करायची हे भरून भविष्यात किती निधी तयार होईल याचा अंदाज घेता येतो.
एक उदाहरण बघूया. समजा तुम्ही दरमहा 10,000 रुपयांची SIP सुरू करता आणि ती प्रत्येक वर्षी 10% ने वाढवता. तुम्ही ही गुंतवणूक 15 वर्षे चालू ठेवली, आणि वार्षिक सरासरी परतावा 12% असल्यास, तुमच्या एकूण गुंतवलेल्या 39,47,919 रुपयांवर तुम्हाला सुमारे 1.14 कोटी रुपयांचा फंड मिळू शकतो. म्हणजेच तुम्हाला जवळपास 74 लाख रुपयांचा परतावा मिळतो तोही केवळ शिस्तबद्ध आणि वाढत्या SIP च्या मदतीने.
स्टेप-अप SIP कशी सुरू कराल?
स्टेप-अप SIP सुरू करण्यासाठी फार काही विशेष करावं लागत नाही. अनेक बँका, म्युच्युअल फंड अॅप्स आणि प्लॅटफॉर्म्स (जसे की Groww, Zerodha, Paytm Money, Kuvera इ.) वर ही सुविधा उपलब्ध आहे. SIP सेट करताना तुम्हाला “Step-up” चा पर्याय दिला जातो, ज्यात तुम्ही किती टक्के वाढ करायची आहे आणि किती वेळाने ती वाढ होईल हे ठरवू शकता.