प्रत्येकजण आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काही ना काही प्रयत्न करतच असतो. कोणीतरी डाएट करतं, तर कोणी जिममध्ये घाम गाळतो. पण या धकाधकीच्या जीवनात जर तुम्हाला असं काही सांगितलं, जे सोपं आहे, वेळ कमी लागतो आणि परिणाम चकित करणारे असतात तर? दररोज 10,000 पावले चालणे ही अशीच एक सवय आहे, जी अगदी सहज अंगीकारता येते आणि त्याचे आरोग्यावर होणारे फायदे ऐकून तुम्हालाही थक्क व्हायला होईल.

10000 पावले का चालावीत?
चालणे ही सर्वात मूलभूत पण प्रभावी क्रिया आहे. कोणत्याही उपकरणाची गरज नाही, कोणत्याही प्रशिक्षकाची गरज नाही. फक्त स्वतःची थोडीशी शिस्त आणि नियमितता. दररोज 10,000 पावले चालल्याने तुमचं शरीर हळूहळू बदलायला लागतं. सुरुवात होते वजन कमी होण्यापासून. साधारणतः 1,000 पावले चालल्यास सुमारे 30 ते 40 कॅलरीज बर्न होतात. याचा अर्थ असा की 10,000 पावले चालल्यास 300 ते 400 कॅलरीज कमी होतात. एका महिन्यात जर तुम्ही दररोज चालत राहिलात, तर 1 ते 1.2 किलो वजन कमी होऊ शकतं, तेही कोणत्याही कठीण डाएट किंवा व्यायामाविना.
पण इथंच फायदे थांबत नाहीत. चालल्याने हृदयाचं आरोग्य सुधारतं.रक्ताभिसरण सुरळीत राहतं, आणि हृदयरोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. अमेरिकन हार्ट असोसिएशननेही याची शिफारस केली आहे. याशिवाय, मधुमेह किंवा रक्तातील साखरेची समस्या असणाऱ्यांसाठीही ही सवय वरदान ठरते. चालल्याने शरीरातील इन्सुलिनचा परिणाम चांगल्या प्रकारे होतो, ज्यामुळे साखर नियंत्रणात राहते.
मिळणारे फायदे
मानसिक आरोग्याच्या बाबतीतही चालणं आश्चर्यकारक परिणाम दाखवतं. चालताना आपल्या शरीरात ‘एंडोर्फिन’ नावाचं संप्रेरक स्रवते, जे नैराश्य, चिंता यासारख्या भावनांपासून दूर ठेवतं. झोप सुधारते, मूड फ्रेश राहतो आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते. शारीरिकदृष्ट्याही चालल्याने पायाचे स्नायू, मांड्या, पाठीचा कणा मजबूत होतो आणि सांधेदुखी, हाडांची झीज यासारख्या समस्या टाळता येतात.
चालण्यामुळे शरीरात एक वेगळी ऊर्जा येते. सतत थकवा येणं, दिवसभर चिडचिड होणं यावर ही सवय चांगला इलाज ठरते. अनेकांना चालण्यामुळे आत्मविश्वासातही वाढ झाल्याचं जाणवतं. ही सवय लावायची असेल, तर सुरुवात छोट्या टप्प्यांतून करा. सुरुवातीला 4,000 ते 5,000 पावले चालण्याचं लक्ष्य ठेवा, नंतर हळूहळू वाढवत 10,000 पावलांपर्यंत पोहोचा. ऑफिसमध्ये किंवा घरी काम करतानाही वेळ काढून चालण्याचा प्रयत्न करा.
स्मार्टफोनमधील वॉकिंग अॅप्स किंवा फिटनेस बँड्स वापरून पावलांची संख्या मोजता येते. जेवणानंतर काही मिनिटं चालल्याने पचन सुधारतं आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण राहतं. म्हणजे फक्त चालून तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.