आजच्या धकाधकीच्या आणि अस्थिरतेने भरलेल्या जगात एक देश किती सुरक्षित आहे, हे त्या देशातील सामान्य नागरिकांच्या जीवनमानावर थेट परिणाम करणारे ठरते. अशातच एका प्रसिद्ध संस्थेने नुकताच प्रसिद्ध केलेला 2025 चा ‘सेफ्टी इंडेक्स’ म्हणजे जगातील देशांची सुरक्षिततेच्या आधारावर केलेली क्रमवारी, चर्चेत आली आहे. या यादीत भारताने अनेकांना आश्चर्य वाटावं असा पराक्रम केला आहे. यावेळी भारताने अमेरिका आणि ब्रिटनसारख्या बलाढ्य देशांना मागे टाकत आपली जागा अधिक सुरक्षित राष्ट्रांमध्ये नोंदवली आहे.

अरब देश आघाडीवर
या यादीत युरोपमधला निसर्गरम्य आणि शांत देश अँडोरा जगातील सर्वात सुरक्षित देश म्हणून ओळखला गेला आहे. फ्रान्स आणि स्पेनच्या सीमांदरम्यान वसलेल्या या छोट्याशा देशाने 84.7 गुण मिळवत पहिलं स्थान पटकावलं. विशेष म्हणजे, यंदाच्या यादीत तीन अरब देशांनी पहिल्या पाच क्रमांकांमध्ये स्थान मिळवलं आहे, ज्यात युएई, कतार आणि ओमान यांचा समावेश आहे. त्यामुळे अरब देशांनी आपल्या सुरक्षिततेच्या पातळीत झालेली वाढ ठळकपणे दाखवून दिली आहे.
भारताची रँकिंग
भारतानेही यंदा समाधानकारक कामगिरी करत 147 देशांच्या स्पर्धेत 66 वं स्थान मिळवलं आहे. भारताला यंदा 55.7 गुण मिळाले असून, अमेरिका (89 वं स्थान, 50.8 गुण) आणि युनायटेड किंगडम (87 वं स्थान, 51.7 गुण) यांच्यापेक्षा भारताची स्थिती चांगली नोंदवली गेली आहे. ही बाब अनेकांसाठी सुखद आश्चर्य ठरली, कारण भारताला गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि सामाजिक तणावांसाठी अनेकदा टीका सहन करावी लागते. मात्र या अहवालाने दाखवून दिलं की, सामान्य नागरिकांच्या दृष्टीने भारताची सुरक्षा परिस्थिती तुलनेत अधिक भक्कम आहे.
शेजारच्या देशांशी तुलना केली तर चीन 76 गुणांसह 15 व्या क्रमांकावर असून, तो एक अत्यंत सुरक्षित देश म्हणून समोर आला आहे. श्रीलंका 59 व्या स्थानी, पाकिस्तान 65 व्या तर बांगलादेश 126 व्या क्रमांकावर आहे. यावरून लक्षात येतं की भारत या क्षेत्रातील अनेक शेजाऱ्यांपेक्षा चांगल्या स्थितीत आहे.
सर्वात असुरक्षित देशांची यादी
दुसऱ्या बाजूला, या यादीत जे देश सर्वात असुरक्षित मानले गेले त्यात व्हेनेझुएला, पापुआ न्यू गिनी, अफगाणिस्तान, हैती, दक्षिण आफ्रिका आणि सीरिया यांचा समावेश आहे. या देशांत राजकीय अस्थिरता, गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण आणि सामाजिक विघटनामुळे लोकांच्या जीवनात प्रचंड असुरक्षितता जाणवते. व्हेनेझुएला या यादीत शेवटच्या स्थानावर असून त्याला केवळ 19.3 सुरक्षा गुण मिळाले आहेत.
या यादीत समाविष्ट देशांचे मूल्यांकन नागरिकांच्या वैयक्तिक अनुभवांवर, गुन्हेगारीच्या प्रकारांवर, पोलिसांवरील विश्वासावर आणि समाजातील शांततेवर आधारित आहे. ही माहिती सरकारी आकडेवारीवर नव्हे, तर वापरकर्त्यांच्या अनुभवांवर आधारलेली असते. त्यामुळे ती अधिक खरी आणि लोकाभिमुख समजली जाते.