देशात स्वच्छतेच्या बाबतीत एक सकारात्मक आणि परिवर्तनकारी लाट निर्माण झाली आहे. ही लाट आहे ‘स्वच्छ भारत मिशन’च्या प्रेरणेतून उगम पावलेली. या मोहिमेने देशभरात स्वच्छतेला केवळ सरकारी उपक्रम म्हणून न पाहता एक सामूहिक जबाबदारी म्हणून स्वीकारण्याची नवी दृष्टी दिली आहे. विशेष म्हणजे काही राज्यांनी या लाटेला केवळ स्वीकारले नाही, तर आपली स्वतःची छाप देखील उमटवली आहे. चला पाहूया, कोणती आहेत ही 7 राज्यं ज्यांनी स्वच्छतेत देशात आघाडी घेतली आहे आणि त्यांच्या यशामागची खरी गोष्ट काय आहे.
मध्य प्रदेश

या यादीत आघाडीवर येते मध्य प्रदेश राज्य. मध्य प्रदेशची गोष्ट सुरू होते इंदूर या शहरापासून, जे गेल्या कित्येक वर्षांपासून स्वच्छतेच्या बाबतीत देशात क्रमांक 1 वर आहे. इंदूरचे हे मॉडेल इतर शहरांनी देखील आत्मसात केले आणि आज मध्य प्रदेश राज्य म्हणूनच स्वच्छतेचा आदर्श ठरले आहे. इथल्या नागरिकांनी देखील स्वच्छतेचा भाग होण्याची मानसिकता तयार केली आहे.
गुजरात
गुजरातमध्ये सुरत, राजकोट आणि अहमदाबाद ही शहरं यंत्रसामग्रीच्या आधुनिकीकरणात आघाडीवर आहेत. तिथे केवळ साफसफाईसाठी आधुनिक यंत्रे नाहीत, तर नियमित कचरा उचलण्याची आणि नाल्यांची साफसफाई करण्याची काटेकोर यंत्रणा आहे. या कामात स्थानिक प्रशासनासोबत नागरिकांचा सहभागही अभिमानास्पद आहे.
महाराष्ट्र
महाराष्ट्राचं उदाहरण दिलं, तर नवी मुंबई, पुणे, ठाणे यांसारखी शहरं फक्त ‘स्वच्छता’ म्हणत थांबलेली नाहीत, तर त्यासाठी जनजागृती, कचऱ्याचे वर्गीकरण आणि कचर्याच्या योग्य विल्हेवाटीवर भर दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे, इथे राहणाऱ्यांनीही स्वतः पुढाकार घेतला आहे, जे खरोखर उल्लेखनीय आहे.
आंध्र प्रदेश
आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणमने तर डिजिटल युगाशी हातमिळवणी करत संपूर्ण कचरा व्यवस्थापन ट्रॅकिंग प्रणाली उभारली आहे. तसंच कचऱ्याचं विल्हेवाटीकरण स्वयंचलित पद्धतीने केलं जातं, ज्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होतो आणि काम अधिक प्रभावी बनतं.
छत्तीसगड
छत्तीसगडचं नाव घेतल्यावर काहीजण आश्चर्यचकित होतील, पण खरं सांगायचं तर ग्रामीण भागात ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची सवय लावण्यात हे राज्य पुढे आहे. गावागावात जनजागृती करून स्वच्छतेला लोकजीवनाचा भाग बनवलं गेलं आहे.
उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात काम करणं सोपं नसतं, पण इथं वाराणसी, लखनऊसारख्या शहरांनी शेवटच्या काही वर्षांत आपलं रँकिंग प्रचंड सुधारलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांतर्गत शौचालय बांधकाम आणि कचऱ्याच्या विल्हेवाटीवर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली आहे.
तामिळनाडू
तामिळनाडूने शहरी भागांमध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमाल केली आहे. कचऱ्याचा पुनर्वापर, प्लास्टिकमुक्त मोहिम, आणि नागरिकांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना यामुळे इथे स्वच्छतेकडे एक सृजनशील दृष्टीकोन ठेवला गेला आहे.