गेल्या काही वर्षांत आपल्या रोजच्या आयुष्यात अनेक मोठे बदल घडलेत. रांगेत उभं राहून पैसे काढण्याची वेळ गेली, कागदांवर सह्या घेण्याचा जमाना संपला, आणि शाळा किंवा बँकसारख्या ठिकाणी जाणंही कधीकधी गरजेचं वाटेनासं झालं. हे सगळं शक्य झालं कारण आपल्या देशाने डिजिटल भारताचं स्वप्न उराशी बाळगत ते प्रत्यक्षात आणलं. आता त्या डिजिटल परिवर्तनाचा अनुभव आपण एक वेगळीच सर्जनशील पद्धत वापरून साजरा करू शकतो, एका मजेशीर आणि अर्थपूर्ण रीलच्या माध्यमातून!

डिजिटल इंडियाला 10 वर्ष पूर्ण
देशभरात एक अनोखी स्पर्धा सुरू झाली आहे. डिजिटल इंडियाच्या 10 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा गौरव करत भारत सरकारने एक खास रील स्पर्धा जाहीर केली आहे. ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यात डिजिटल इंडियामुळे झालेल्या सकारात्मक बदलांवर अवघ्या 1 मिनिटाची रील तयार करून पाठवायची आहे. ही रील तुमच्या जीवनातील प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित असावी. जसं की UPI चा वापर करून पैसे पाठवणं, डिजिटल शिक्षणाने शिकण्याचं सुलभ झालेलं माध्यम, किंवा रेशन कार्डसारखी सरकारी सेवा आता फक्त काही क्लिकमध्ये मिळणं.
स्पर्धेच्या अटी आणि बक्षीस
या स्पर्धेत सहभागी होणं अगदी सोपं आहे. तुम्ही MyGov या अधिकृत प्लॅटफॉर्मवरून तुमची रील पाठवू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. ही रील पूर्णतः ओरिजनल असावी. कुठल्याही प्रकारचा मजकूर कॉपी-पेस्ट केल्यास किंवा ती सोशल मीडियावर आधीच पोस्ट केली असल्यास, तुमचं नाव निवड प्रक्रियेत गाळलं जाऊ शकतं.
या संधीमध्ये फक्त तुमचा अनुभव मांडण्याचीच नव्हे, तर रोख बक्षिसं जिंकण्याचीही संधी आहे. देशभरातून निवडल्या जाणाऱ्या टॉप 10 विजेत्यांना प्रत्येकी 15,000 रुपये मिळतील. त्यानंतरच्या 25 विजेत्यांना 10,000 रुपये, आणि शेवटच्या 50 निवडलेल्या स्पर्धकांना प्रत्येकी 5,000 रुपये बक्षीस म्हणून दिलं जाईल.
या संधीचा उपयोग करून, तुम्ही तुमच्या आयुष्यात घडलेला डिजिटल बदल इतरांपर्यंत पोहोचवू शकता आणि देशाच्या बदलत्या चेहऱ्याचं तुमच्या दृष्टिकोनातून एक वेगळं दर्शन घडवू शकता.