दुधही असते मांसाहारी! काय आहे हा प्रकार आणि कशापासून बनते हे मांसाहारी दूध?, जाणून घ्या

Published on -

आजच्या वेगवान जीवनशैलीत आपण काय खातो, पितो, त्याचा आपल्या शरीरासोबतच आपल्या संस्कृतीवरही मोठा परिणाम होतो. भारतात दूध ही केवळ आरोग्यासाठी उपयुक्त गोष्ट नाही, तर श्रद्धेचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे जेव्हा ‘मांसाहारी दूध’ या संकल्पनेचा उल्लेख होतो, तेव्हा तो केवळ आहाराचा नव्हे, तर मूल्यांचा, परंपरांचा आणि ओळखीचा मुद्दा ठरतो.

काय आहे मांसाहारी दूध?

सध्या जागतिक बाजारपेठेत काही देश जसं की अमेरिका, युरोप, ब्राझील, मेक्सिको, थायलंड आणि रशिया अशा पद्धतीनं दूध उत्पादन करतात जिथे जनावरांना मांस, रक्त किंवा मासे यांच्यापासून तयार केलेला चारा दिला जातो. या चाऱ्यामुळे जनावरांचं दूध उत्पादन वाढतं, वजनही अधिक होतं, त्यामुळे तो एक फायदेशीर पर्याय मानला जातो.

मात्र भारतासाठी ही कल्पना स्वीकारणं तितकीशी सोपी नाही. कारण येथे गायीला केवळ दूध देणारी जनावर म्हणून पाहिलं जात नाही, तर तिला ‘आई’चं स्थान दिलं जातं. तिचं दूध धार्मिक विधींसाठी पवित्र मानलं जातं. त्यामुळे गायीने खाल्लेलं अन्नसुद्धा शुद्ध असावं, ही भारतीय भावनांची मूळ मागणी आहे.

भारताकडून कडाडून विरोध

या पार्श्वभूमीवर भारताने अमेरिकेला स्पष्टपणे कळवलं आहे की जर त्यांना इथं दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ विकायचे असतील, तर त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गायींना शुद्ध शाकाहारी चारा दिला गेला पाहिजे. नाहीतर तो माल येथे स्वीकारला जाणार नाही. हे केवळ एका व्यापारविषयक अटीचं पालन नाही, तर भारताच्या सांस्कृतिक ओळखीचं संरक्षण आहे. कारण भारतात दूध हे मंदिरात देवाला अर्पण केलं जातं, ती श्रद्धा ‘मांसाहारी प्रक्रिये’तून तयार झालेल्या दुधाशी जुळू शकत नाही.

यातून एक गोष्ट लक्षात येते की, पोषणाच्या दृष्टीने शाकाहारी व मांसाहारी चारा खाणाऱ्या जनावरांच्या दुधात फारसा फरक नसला, तरी भारतात दूध हे केवळ शरीरासाठीच नव्हे, तर आत्म्यासाठीही असतं. त्यामुळे कोणतं दूध प्यावं, हे ठरवताना केवळ वैज्ञानिक मुद्दे नाही, तर सांस्कृतिक आणि भावनिक घटकही महत्त्वाचे ठरतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!