Google Pay, PhonePe किंवा पेटीएमवरून चुकीच्या खात्यावर पैसे सेंड झाले? मग घाबरू नका! ‘या’ 4 स्टेप्स वापरुन मिळवता येतील पैसे

Published on -

डिजिटल व्यवहारांचं जग जितकं सोयीचं आहे, तितकंच ते चुकांनाही आमंत्रण देतं. हल्ली जवळपास प्रत्येकजण गुगल पे, फोनपे, पेटीएम किंवा BHIM सारख्या यूपीआय अ‍ॅप्सचा वापर करत आहे. मात्र घाई, चुकून नंबर चुकीचा टाकणं किंवा नाव नीट न पाहता पैसे पाठवणं, या चुका सहज घडतात. एकदा का पैसे चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात गेले, की मनात भीती निर्माण होते “हे पैसे आता परत येणार का?” पण घाबरू नका. योग्य पद्धतीने प्रयत्न केल्यास तुमचे पैसे परत मिळू शकतात.

अ‍ॅपवरच करा तक्रार

सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसे चुकीच्या यूपीआय नंबरवर गेल्याचं लक्षात येताच सर्वप्रथम ज्याच्याद्वारे तुम्ही पैसे पाठवले आहेत, जसं की Google Pay, PhonePe किंवा Paytm त्या अ‍ॅपमध्ये जा आणि त्या व्यवहाराचा तपशील उघडा. तिथं “Report a problem” किंवा “Raise a complaint” असा पर्याय असतो. त्यावर क्लिक करून सविस्तर माहिती द्या. ट्रान्झॅक्शन आयडी, तारीख, वेळ आणि तुमचा प्रश्न. शक्य असल्यास त्या व्यवहाराचा स्क्रीनशॉटही अपलोड करा.

बँकेशी संपर्क साधा

अ‍ॅपकडून त्वरित प्रतिसाद न मिळाल्यास पुढचा टप्पा म्हणजे तुमच्या बँकेशी संपर्क साधणं. कस्टमर केअरला कॉल करा किंवा बँकेच्या शाखेत भेट द्या. ट्रान्झॅक्शनची माहिती द्या, ज्यामध्ये UPI रिफरन्स नंबर, तारीख आणि वेळ आवश्यक असते. बँक तुमच्याकडून ही माहिती घेतल्यावर, ती पैसे मिळवणाऱ्या खातेदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल. अनेक वेळा, दुसरी व्यक्ती पैसे परत करण्यास तयार असल्यास ही प्रक्रिया थोडी सुलभ होते.

NPCI कडे तक्रार

पण जर बँकेकडूनही निराकरण झालं नाही, तर एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे NPCI नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. https://www.npci.org.in या अधिकृत वेबसाइटवर जा आणि “Dispute Redressal Mechanism” विभागात तुमची तक्रार नोंदवा. तिथंही तुम्हाला व्यवहाराशी संबंधित माहिती भरावी लागेल, ज्यात UPI ID, संदर्भ क्रमांक, तारीख, वेळ आणि तुमचा मोबाईल नंबर यांचा समावेश असेल.

कायदेशीर तक्रार

जर या सर्व प्रयत्नांनंतरही संबंधित व्यक्ती मुद्दाम पैसे परत करण्यास नकार देत असेल, तर शेवटचा मार्ग म्हणजे कायदेशीर तक्रार. https://cybercrime.gov.in या पोर्टलवर सायबर क्राइम तक्रार नोंदवता येते. त्या तक्रारीची प्रत तुमच्या बँकेला द्या, जेणेकरून बँक अधिकृत कायदेशीर प्रक्रिया सुरू करू शकेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!